पालिकेने झटकली धोकादायक झाडांची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 07:18 AM2018-05-06T07:18:47+5:302018-05-06T07:18:47+5:30

पावसाळ्यात झाडे कोसळण्याचा धोका अधिक असल्याने, नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी महापालिकेने नामी उपाय सुचविला आहे. खासगी आणि सरकारी जमिनीवर सर्व झाडांची निगा राखणे संबंधित मालकाची जबाबदारी आहे, असे यापूर्वीच प्रशासनाने जाहीर केले होते. त्यानंतर, आता रस्त्याच्या कडेला व खासगी आवारात असलेल्या धोकादायक झाडांवर ‘चेतावनी’चे फलक लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

 The responsibility of the dangerous plants | पालिकेने झटकली धोकादायक झाडांची जबाबदारी

पालिकेने झटकली धोकादायक झाडांची जबाबदारी

Next

मुंबई  - पावसाळ्यात झाडे कोसळण्याचा धोका अधिक असल्याने, नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी महापालिकेने नामी उपाय सुचविला आहे. खासगी आणि सरकारी जमिनीवर सर्व झाडांची निगा राखणे संबंधित मालकाची जबाबदारी आहे, असे यापूर्वीच प्रशासनाने जाहीर केले होते. त्यानंतर, आता रस्त्याच्या कडेला व खासगी आवारात असलेल्या धोकादायक झाडांवर ‘चेतावनी’चे फलक लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रमाण वाढते. विशेषत: रस्त्याच्या कडेला असलेली झाडे पादचाऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत. गेल्या महिन्यात नायगाव येथे मुंंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील गुलमोहोरचे झाड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत असल्याने, आपला बचाव करण्यासाठी महापालिकेने झाडांची जबाबदारी नागरिकांवरच सोपविली आहे. त्यानुसार, आपल्या आवारातील धोकादायक झाड किंवा त्याच्या फांद्या पावसाळ्यापूर्वीच छाटून घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन उद्यान विभागामार्फत करण्यात आले आहे.
रस्त्याच्या कडेला असलेले झाड विशेषत: धोकादायक ठरत असतात, यापैकी बºयाच झाडांचे रोपण महापालिकेनेच केलेले असते. काँक्रिटीकरणामुळे या झाडांची मूळ कमकुवत झालेली असतात. त्यामुळे पावसाळ्यात अथवा त्यानंतर अशी झाडे कोसळण्याचा धोका वाढतो. अशा झाडांची पाहणी करून, खासगी आवारातील झाडे रस्त्यांच्या बाजूने धोकादायक पद्धतीने झुकलेली असल्यास, त्यावर झाड धोकादायक स्थितीत असून, त्याखाली कोणीही थांबू नये, असे फलक लावण्याचे आदेश पालिका प्रशासनाने मासिक आढावा बैठकीत शनिवारी अधिकाºयांना दिले.

झाडांची पाहणी मोहीम
पावसाळ्यापूर्वी झाडांची पाहणी करून झाडे सुरक्षित करण्याचे आदेश आयुक्त अजोय मेहता यांनी अधिकाºयांना दिले आहेत. त्यानुसार, येत्या पंधरा दिवसांत झाडांची पाहणी करून, त्यावर धोक्याचे फलक लावण्यात येणार आहे.

झाडांची आकडेवारी
वृक्षगणनेनुसार मुंबईत एकूण २९ लाख ७५ हजार २८३ झाडे आहेत. यापैकी १५ लाख ६३ हजार ७०१ एवढी झाडे खासगी आवारांमध्ये आहेत, तर ११ लाख २५ हजार १८२ एवढी झाडे शासकीय परिसरांमध्ये आहेत. या व्यतिरिक्त एक लाख ८५ हजार ३३३ झाडे ही रस्त्यांच्या कडेला असून, उर्वरित एक लाख एक हजार ६७ एवढी झाडे विविध उद्यानांमध्ये आहेत.

झाडांची छाटणी बंधनकारक

महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ नुसार झाडांची छाटणी किंवा मृत/धोकादायक झाड कापायचे झाल्यास, त्याबाबत महापालिकेद्वारे पूर्व परवानगी घेऊन छाटणी करणे बंधनकारक आहे, तसेच छाटणी झाल्यानंतर झाडाच्या तोडलेल्या फांद्या व इतर कचºयाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही संबंधितांचीच आहे, असे पालिकेने बजावले आहे.

सात दिवसांत प्रक्रिया पूर्ण
महापालिका नियुक्त ठेकेदाराद्वारे झाडाची छाटणी करण्यासाठी नियमांनुसार विहित शुल्क विभाग कार्यालयाकडे जमा केल्यानंतर, त्यापुढील सात दिवसांत झाडांच्या छाटणीची प्रक्रिया केली जाते, अशी हमी महापालिकेने दिली आहे. मात्र, यापूर्वीच्या सर्व दुर्घटनांमध्ये महापालिकेने संबंधितांना परवानगी देण्यास बराच
विलंब केल्याची
तक्रार करण्यात येत असते.

Web Title:  The responsibility of the dangerous plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.