स्नेहा मोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाषा संचालनालयातील भाषा संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार अवर सचिव हर्षवर्धन जाधव यांच्याकडे होता. मात्र, या कार्यभाराचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने, आता ही जबाबदारी नव्या व्यक्तीकडे सोपविण्यात आली आहे. २७ मार्च रोजी जाधव यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यानंतर, आता भाषा संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार अवर सचिव नंदा राऊत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे अजूनही भाषा संचालनालयाचा भार अतिरिक्त खांद्यावरच आहे.
राज्य शासनामार्फत नुकत्याच करण्यात आलेल्या बदल्यांमुळे भाषा संचालनालयाला ‘पूर्णवेळ’ वाली नसल्याचे उघड झाले आहे. भाषा संचालकपदी प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्याचा भार आता नंदा राऊत यांच्या रूपात अवर सचिवांच्या खांद्यावर देण्यात आला. २०११पासून आतापर्यंत भाषा संचालकाचे पद रिक्त आहे. २०११ साली नोव्हेंबर महिन्यात गौतम शिंदे यांनी ९-१० महिन्यांच्या कालावधीसाठी संचालकपद भूषविले होते.आठ वर्षांत १२ वेळा बदलले भाषा संचालकच्२०१२ मध्येही भाषा संचालक, उपसंचालक, सहायक भाषा संचालक, भाषा अधिकारी आदी पदांसाठीही उमेदवार न मिळाल्याने, सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात आला होता. नव्या अध्यादेशात दुरुस्तीनंतरही प्रशासकीय सेवेतील दीर्घ अनुभव, संस्कृत पदवीधर, अनुवादाचा किंवा परिभाषा कोश निर्मितीचा किंवा शब्दावली-शब्दकोश निर्मितीचा ७ वर्षांचा अनुभव असलेली व्यक्ती न मिळाल्याने २०१२ मध्ये यात बदल करून, अनुवादाचा अनुभव पाच वर्षांचा असावा, अशी अट घातली.च्जाहिरात देऊनही उमेदवार मिळाला नव्हता. अखेर संचालकाचा प्रभार हा उपसचिवांकडेच दिला जात आहे. या उपसचिवांच्या बदल्या होत राहतात, अशा रीतीने गेल्या आठ वर्षांत १२ वेळा भाषा संचालक बदलले.