सचिन लुंगसे/शेफाली परब-पंडित मुंबई : घाटकोपर येथील शांतीसागर या सात मजली इमारतीची लिफ्ट सोमवारी रात्री कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जण जखमी झाले. घाटकोपरच्या घटनेला काही तास उलटत नाहीत तोवर वांद्रे येथे मंगळवारी सकाळी घडलेल्या लिफ्ट दुर्घटनेत राधेश्याम हरिजन (६०) यांचा मृत्यू झाला. येथील दोन्ही घटना २४ तासांतील असून, लिफ्ट दुर्घटनांचा आकडा वाढत आहे. नुसता आकडा वाढत नाही, तर लिफ्टच्या दुर्घटनांमधील जखमींसह मृतांचा आकडा वाढत आहे. या दुर्घटनांची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याऐवजी प्रत्येक इमारतीमधील सोसायटीने लिफ्टच्या देखभाल दुरुस्तीचे काम वेळच्या वेळी करणे गरजे आहे. लिफ्टच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सोसायट्यांची असून, लिफ्टचा परवाना नूतनीकरण करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याची भूमिकाही यात महत्त्वाची आहे, असे अनेक मुद्दे गृहनिर्माण क्षेत्रातील तज्ज्ञांनी ‘लोकमत’कडे मांडले. घाटकोपर आणि वांद्रेयेथील लिफ्ट दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने तज्ज्ञांशी संवादसाधला.गृहनिर्माण क्षेत्रातील तज्ज्ञ रमेश प्रभू यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, कोणत्याही सोसायटीच्या लिफ्टची जबाबदारीही सर्वस्वी सोसायटीवरच असते. लिफ्टच्या देखभाल दुरुस्तीचे काम सोसायटीनेच करणे गरजेचे असते. आपण आपल्या सोसायटीमध्ये जेव्हा लिफ्ट बसवितो; तेव्हा आपण लिफ्टच्या कंपनीशी करार करतो. हा करार एक किंवा तीन वर्षांचा असतो. या करारानुसार कंपनीच्या कर्मचारी वर्गाकडून महिन्यातून एकदा लिफ्टची तपासणी केली जाते. आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लिफ्ट परवान्याचे नूतनीकरण केले जाते. वर्षातून दोन वेळा म्हणजे सहा महिन्यांतून एकदा लिफ्टच्या परवान्याचे नूतनीकरणे केले जाते. हे नूतनीकरण करताना सार्वजनिक बांधकाम खात्याचा निरीक्षक लिफ्टची तपासणी करत असतो. हे दोन मुद्दे लक्षात घेता कोणत्याही इमारतीच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सोसायटीची असल्याने दुर्घटना घडू नये म्हणून सोसायटीनेच सजग राहणे गरजेचे असते.ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर प्रभू यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, इमारतीमधील लिफ्टच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही सोसायटीची असते. लिफ्ट परवाना, लिफ्ट परवान्याचे नूतनीकरण हेदेखील मुद्दे महत्त्वाचे असून, प्राथमिक मुद्दा हा लिफ्टच्या देखभाल दुरुस्तीचा असतो आणि ही जबाबदारी सोसायटीची असते.वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त गॉडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले की, लिफ्टच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी जशी सोसायटीची आहे; तशी ती सार्वजनिक बांधकाम खात्याचीही आहे. कारण लिफ्टच्या परवान्याच्या नूतनीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याचे असते. सार्वजनिक बांधकाम खात्याचा निरीक्षक वर्षातून दोनदा लिफ्टची तपासणी करत असतो. तपासणीदरम्यान ज्या त्रुटी आढळतील; त्या त्रुटी निरीक्षकाने सोसायटीच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे असते. यावर सोसायटीने कार्यवाही करणे गरजेचे असते. मात्र, आपल्याकडे सर्व कारभार हा अनागोंदी पद्धतीने होतो. लिफ्टच्या परवान्याचे नूतनीकरण करताना कळीचा मुद्दा पाहिला जात नाही.मुंबईतील उत्तुंग इमारतींमधील गच्चीपर्यंत लिफ्ट नेण्याचा मार्ग गेल्या वर्षी महापालिकेने मोकळा केला. मात्र, आजही अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये लिफ्टची नियमित देखभाल केली जात नाही. त्यामुळे मध्येच बंद पडणाºया लिफ्ट धोकादायक ठरत असून, निष्पाप रहिवाशांच्या जिवावर बेतत आहे.दरवर्षी मुंबईतील इमारतींमधील लिफ्ट कोसळण्याची एखादी घटना घडते. तीन वर्षांपूर्वी मालाडमध्ये एका इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून तरुणीचा मृत्यू झाला होता. दोन दशकांपूर्वी मुंबईत बहुतेक इमारती चार मजलीच असल्याने लिफ्टची गरज भासत नव्हती. मात्र, उत्तुंग इमारतींच्या स्पर्धा सुरू झाल्यावर लिफ्टला प्राधान्य दिले जाऊ लागले.मुंबईतील रहिवासी, व्यावसायिक, औद्योगिक इमारतींमधील ३५ हजार ६४३ लिफ्ट नोंदणीकृत आहेत. परंतु, बेकायदा इमारतींप्रमाणे लिफ्टची संख्याही अधिक असल्याचे महापालिकेच्या एका अधिकाºयाने सांगितले. लिफ्टचा वापर प्रामुख्याने लहान मुले, गर्भवती स्त्रिया, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांनी करणे अपेक्षित आहे.मुंबईतील उत्तुंग इमारतींमध्ये गच्चीपर्यंत लिफ्टची व्यवस्था कारण्याची परवानगी महापालिकेने गेल्या वर्षी दिली. त्यानुसार विकास नियंत्रण नियमावलीत तसा बदलही करण्यात येत आहे. विकास नियोजन आणि इमारत प्रस्ताव विभागाकडे प्रस्ताव सादर केल्यास यासाठी परवानगी मिळणार आहे. इमारतीमध्ये लिफ्टची परवानगी घेण्यासाठी महापालिकेच्या इमारत प्रस्ताव व विकास नियोजन विभागाकडे अर्ज करण्यात येतो. मात्र, त्यानंतर लिफ्टचा वापर करणाºया रहिवाशांच्या सुरक्षेसाठी संबंधित सोसायटीच्या पदाधिकारी अथवा मालकाने योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे.लिफ्टमध्ये पंखा, वायुविजन व्यवस्था कार्यरत असल्याची खबरदारी घ्यावी.लिफ्टमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी.सुरक्षारक्षकाचा भ्रमणध्वनी क्रमांक लिफ्टमध्ये नमूद करावा.लिफ्टमध्ये अग्निरोधक यंत्रणा असावी.लिफ्टमधून सिमेंट/रेतीच्या गोणी, तत्सम अतिरिक्त वजनाच्या वस्तू वाहून नेण्यास मनाई असावी.लिफ्टसंबंधी तक्रारी/सूचना असल्यास त्याची नोंद झाली पाहिजे आणि समितीने कार्यवाही केली पाहिजे.लिफ्टचा विमा काढावा, लिफ्ट बंद पडल्यास, लिफ्टमध्ये अडकून पडल्यास घाबरू नये. लिफ्टमधील उपलब्ध सुरक्षा प्रणालीचा वापर करावा. मदतीसाठी आवाज द्यावा.आग लागल्यास किंवा आग विझविण्यासाठी लिफ्टचा वापर करू नका.
लिफ्टची जबाबदारी सोसायटीचीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 2:51 AM