अक्षय चोरगे मुंबई : २९ आॅगस्टच्या पावसाने शहर तुंबले, यास प्रशासनाइतकेच मुंबईकरही जबाबदार आहेत. नाले तुंबणे, कच-याची समस्या उद्भवणे, प्लॅस्टिकची समस्या या सर्वांना मुंबईतील नागरिकच सर्वस्वी जबाबदार आहे, असा सूर विविध तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. शहरातील गटारे, पर्जन्य वाहिन्या, मलनि:सारण वाहिन्यांचे पुरेसे जाळे तयार करण्यात, पालिका प्रशासन अपयशी ठरल्याचे मत मांडून तज्ज्ञांनी पालिकेलाही फैलावर घेतले.कच-याचे नियोजन ही फक्त पालिकेची जबाबदारी नसून, सर्व नागरिकांची जबाबदारी आहे. कचºयाच्या नियोजनाबाबत नागरिक जागरूक असणे गरजेचे असल्याचे मत, नगररचना तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी मांडले. कचरा समस्या सोडविण्यासाठी फक्त ‘शिक्षा’ करण्यापेक्षा प्रशासनाने, नागरिकांच्या ‘शिक्षणा’साठीही पुढाकर घ्यावा. कचरा नियोजनाबाबत नागरिकांमध्ये अनास्था असल्यामुळे, २९ आॅगस्टला शहर तुंबण्याचा प्रसंग ओढावला. त्यामुळे कचरा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने नागरिकांमध्ये जनजागृती करावी. नागरिकांनीही पुढाकार घेऊन प्रशासन राबवित असलेल्या उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावा, असेही महाजन म्हणाल्या.‘रॅली फॉर रिव्हर’चीही जनजागृतीशहरातील नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नद्यांवरील अतिक्रमणांमुळे थोड्या पावसातही पूरजन्य परिस्थिती उद्भवते. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, याकरिता पर्यावरणतज्ज्ञ, स्वयंसेवी संस्थासतत विविध उपक्रम राबवित असातत. असाच उपक्रम भांडुपमधील कुकरेजा कॉम्प्लेक्स मित्रमंडळ आणि शिवगजर प्रतिष्ठानने संयुक्तपणे राबविला. कुकरेजा कॉम्प्लेक्स मित्रमंडळ आणि शिवगजर प्रतिष्ठान यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीत ‘रॅली फॉर रिव्हर’ या मोहिमेंतर्गत जनजागृती केली. या वेळी मंडळातील लोकांनी ‘रॅली फॉर रिव्हर’चे बॅनर आणि टी-शर्ट परिधान करून विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले. ‘रॅली फॉर रिव्हर’ ही मोहीम मुंबईतील नद्यांच्या संरक्षण आणि संवर्धनावर काम करते, तसेच ‘रॅली फॉर रिव्हर’ या विषयावर पदनाट्य सादर करण्यात आले.
कच-याचे नियोजन ही मुंबईकरांचीही जबाबदारी; मलनि:सारण, पर्जन्य वाहिन्यांचे जाळे तयार करण्यात अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 3:01 AM