सलील कुलकर्णी (संगीतकार)
आशा भोसले यांना मिळालेल्या ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कारामुळे वास्तविक हा पुरस्कारच उजळून निघाला आहे. आशाताई काय किंवा लतादीदी काय, ही जागतिक स्तरावरची मंडळी आहेत. त्यांना मिळणाऱ्या पुरस्कारामुळे पुढच्या पिढीची जबाबदारी खूप वाढते. ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कारामुळे त्यांचा आशीर्वादच या पुरस्काराला लाभला आहे आणि या पुरस्काराच्या रूपाने महाराष्ट्रातील रसिकांना त्यांचा आशीर्वाद मिळाला आहे.
* अतिशय आनंदाचा क्षण
कौशल इनामदार (संगीतकार)
आशा भोसले यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार मिळाला हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. हा पुरस्कार त्यांना मिळायला हवाच होता. अतिशय अनिवार्य अशी ही गोष्ट होती. आशा भोसले यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार मिळणे, हा त्या पुरस्काराचाच सन्मान आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने आशा भोसले यांची मराठीतील कार्याची अधिकृतपणे दखल घेतली गेली आहे, असे मला वाटते आणि त्याचा मला निस्सीम आनंद आहे. आशा भोसले यांनी सुरेलपणा आणि आवाजाची क्वालिटी एवढी वाढवून ठेवली आहे, की त्याच्या कमी पातळीवरचे गाणे आपल्याला आता चालतच नाही. महाराष्ट्राची तमाम जनता आशा भोसले यांच्या सुराने लाडावलेली आहे.
* संगीतक्षेत्रात दिलेले योगदान प्रचंड
नेहा राजपाल (पार्श्वगायिका)
खूपच आनंदाची बातमी आहे. वास्तविक कितीही पुरस्कार त्यांना मिळाले, तरी ते कमीच होतील. त्यांनी मराठी संगीतक्षेत्रात दिलेले योगदान प्रचंड आहे. चित्रपटांतील गाण्यांसह नॉन फिल्मी गाण्यांसाठी त्यांनी गायलेली गाणीही महत्त्वाचे स्थान राखून आहेत. ही गाणी असोत, नाट्यसंगीत असो किंवा गझल असो, अशा विविध प्रकारची गाणी सहज गाणाऱ्या त्या एकमेव व्यक्ती आहेत.