धोकादायक झाडांची जबाबदारी जमीन मालकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 02:26 AM2018-05-04T02:26:16+5:302018-05-04T02:26:16+5:30
गेल्या महिन्यात नायगाव येथे मुंंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील गुलमोहराचे झाड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
मुंबई : गेल्या महिन्यात नायगाव येथे मुंंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील गुलमोहराचे झाड कोसळून
एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याचे
तीव्र पडसाद सर्वत्र उमटत असल्याने आपला बचाव करण्यासाठी महापालिकेने झाडांची जबाबदारी नागरिकांवरच सोपविली आहे. त्यानुसार आपल्या आवारातील धोकादायक झाड किंवा त्याच्या
फांद्या पावसाळ्यापूर्वीच छाटून घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन उद्यान विभागामार्फत करण्यात आले आहे.
निवासी वसाहती, शासकीय व निम शासकीय कार्यालये, खाजगी जागेवर असणाऱ्या झाडांची निगा घेण्याची सर्व जबाबदारी ही संबंधित मालकाची आहे. पावसाळ्याच्या काळात झाडे पडून वित्त व जीवित
हानी होण्याची शक्यता असल्याने
सर्व संबंधितांनी महापालिकेच्या
पूर्व परवानगीने आपल्या परिसरातील अवास्तव वाढलेल्या झाडांच्या
फांद्या पावसाळ्यापूर्वीच
छाटाव्यात, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
सात दिवसांत प्रक्रिया पूर्ण
महापालिका नियुक्त ठेकेदाराद्वारे झाडाची छाटणी करण्यासाठी नियमांनुसार विहित शुल्क विभाग कार्यालयाकडे जमा केल्यानंतर त्यापुढील सात दिवसांत झाडाच्या छाटणीची प्रक्रिया केली जाते, अशी हमी महापालिकेने दिली आहे. मात्र यापूर्वीच्या सर्व दुर्घटनांमध्ये महापालिकेने संबंधितांना परवानगी देण्यास बराच विलंब केल्याची तक्रार करण्यात येत असते.