विश्रांती...गप्पा आणि गाठीभेटी !
By admin | Published: February 23, 2017 07:09 AM2017-02-23T07:09:21+5:302017-02-23T07:09:21+5:30
गेले दोन महिने निवडणुकांच्या रणधुमाळीत व्यस्त असलेल्या सर्वपक्षीय उमेदवारांनी
टीम लोकमत ल्ल मुंबई
गेले दोन महिने निवडणुकांच्या रणधुमाळीत व्यस्त असलेल्या सर्वपक्षीय उमेदवारांनी बुधवारी संपूर्ण दिवस विश्रांती घेतली. आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालविणे, कार्यकर्त्यांशी गप्पा मारणे, मतदारांचे आभार मानणे, थोरामोठ्यांचे आशीर्वाद ते अगदी सकाळी उशिरा उठण्यापर्यंत या उमेदवारांनी हा दिवस तणावमुक्त घालविण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी असणाऱ्या मतदानाच्या निकालामुळे होणारी जिवाची घालमेल काही काळ का होईना, बाजूला सारून पुन्हा या उमेदवारांनी मित्रपरिवारासोबत जेवणाचा बेत करून, पोरं-बाळांसोबत खेळून आणि स्वयंपाक घरात जेवण बनवीत हा दिवस घालविल्याचे दिसून आले.
कुटुंबीयांसोबतच मतदारांच्या गाठीभेटी
मतदानाच्या दिवशी सकाळपासून खूप धावपळ सुरू होती, त्यात घरात मी आणि माझे पतीही निवडणुकीच्या रिंगणात असल्याने सगळ्यांचीच अधिक धावपळ झाली. गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असल्यामुळे आम्हाला एकमेकांसाठी आणि कुटुंबीय, मित्रपरिवारासाठी वेळच मिळाला नव्हता. त्यामुळे बुधवारी सकाळी आम्ही दोघांनीही कुटुंबीयांसोबत वेळ घालविला, चहा घेऊन गप्पा मारल्या. - यामिनी जाधव, प्रभाग २१०, शिवसेना
चिंतन, मनन करीत दिवस घालविला
आजचा दिवस शांततेत घालविला. दिवसभरात मागच्या दहा दिवसांचे मनन, चिंतन केले आहे. दिवस उशिरा सुरु झाल्याने सकाळचा वेळ कुटुंबासोबत घालवला. गेल्या कित्येक दिवसांत घरी शांतपणे बसून त्यांच्याशी बोलता आले नव्हते, त्यांच्याशी गप्पा मारल्या. सकाळी अकराच्या सुमारास बाहेर पडलो. माझ्यासाठी अनेक महिला कार्यकर्त्या, लहान मुले आणि कार्यकर्ते कार्यरत होते. त्यातल्या काहींशी संवाद साधला. निवडणुकीदरम्यान झालेल्या गमतीजमती, त्यांचे अनुभव ऐकले. नवीन वॉर्ड असल्यामुळे त्या लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि त्यावर काय करता येईल याचा विचार केला.
- सुरेंद्र बागलकर, प्रभाग २२०, शिवसेना
मुलाचा अभ्यास अन् मनसोक्त स्वयंपाक
थोडी विश्रांती घेतली, मुलगा दहावीत असल्यामुळे त्याच्या अभ्यासाकडे थोडे लक्ष दिले. रोज प्रचारात वडापाव खाऊन कंटाळा आला होता़ स्वत: आवडता पदार्थ बनवला़ प्रभाग समितीच्या बैठकीत सहभागी झाले.
- शीतल मुकेश म्हात्रे, प्रभाग ७, शिवेसना
देवीचे आशीर्वाद घेतले
परिसरातील मोटादेवीसमोर नतमस्तक होऊन तिचे आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर मंगळवारी किती मतदान झाले, याचा आढावा घेण्यासाठी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. निकालानंतर साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जायचे आहे, त्याचे प्लानिंग केले. सायंकाळी चहापान करत मित्रपरिवार आणि आप्तेष्टांसोबत वेळ काढला़
- राजन पाध्ये, प्रभाग ५८, शिवसेना
मोठ्यांचा आशीर्वाद घेतला
बुधवारचा संपूर्ण दिवस निवांतच होते. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, नातेवाइकांशी गप्पा मारल्या. कित्येक दिवसांनंतर कुटुंबीयांसोबत वेळ घालवला. आयुष्यात कोणतीही मोठी घडामोड घडत असल्यास मोठ्यांचा आशीर्वाद घेते. आशीर्वाद घेऊन उद्याच्या निकालाला सामोरे जाणार आहे.
- सुषमा शेखर, प्रभाग २२६, काँग्रेस
मुलासोबत खूप खेळले
गेले कित्येक दिवस प्रचार, सभा, बैठका यामुळे मुलाला वेळ देता आला नाही. आई-वडील कमी वेळ भेटतात म्हणून तोही नाराज होता. निवडणूक पार पडताच बुधवारचा संपूर्ण दिवस त्याच्यासाठीच राखून ठेवला होता. कुठेही बाहेर गेले नाही. त्याच्यासोबत खूप खेळले. दुपारी चांगली झोप काढली, मतदान होऊन गेले आहे. त्याचे टेन्शन आता घेऊन काय होणार? जो निकाल येईल त्याचा सामना करण्याची तयारी आहे.
- स्वप्ना देशपांडे, प्रभाग १९१, मनसे
कार्यकर्त्यांचे आभार...
सकाळी थोडी उशिराच जाग आली. बऱ्याच दिवसांनंतर निवांत झोपलो. कुटुंबासोबत नाश्ता घेतला. विक्रोळी, कांजूरमार्ग परिसरातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीत संपूर्ण दिवस गेला. त्यांच्यामुळेच मी उभा आहे. माझ्याबरोबरीने त्यांची मेहनत यात होती, त्यांचे आभार मानण्यासाठी मी त्यांच्या घरी, कार्यालयात जाऊन भेटी घेतल्या. त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. महिन्याभरात काय केले, काय राहिले यावर चर्चा रंगल्या.
- मंगेश सांगळे, प्रभाग ११८, भाजपा
कुटुंबासह घालवला दिवस
गेले काही महिने निवडणुकीची तयारी सुरू असल्याने कुटुंबीयांना वेळ देता आला नव्हता. कित्येक दिवसांत शांत झोप नव्हती. आज शांत झोप लागली. कुटुंबाला वेळ देता आला. दिवसभर घरीच राहून कुटुंबाला प्राधान्य दिले. घरचेही खूश होते. आज मोठा दिवस आहे. निकालाविषयी उत्सुकता आहे, टेन्शन नाही.
- रवी राजा, प्रभाग १७६, काँग्रेस
कुटुंबासोबत जेवणाचा बेत...
महिनाभराने सकाळी आरामात उठलो. त्यानंतर सलूनमध्ये जाऊन आलो. तेथूनच थेट कार्यालय गाठले. कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दुपारी कुटुंबीयांसोबत जेवणाचा बेत उरकला. त्यामुळे महिनाभरानंतर खूपच रिलॅक्स वाटले. जेवणादरम्यान महिनाभरात घडलेल्या कुटुंब आणि आप्तेष्टांच्या घडामोडींचा आढावा घेतला. त्यांनाही खूप बरे वाटले आणि मलाही. निकालाची काळजी नाही. मुलुंडमधील मतदारांनी जो निर्णय घेतला त्याचे स्वागत असेल. जेवणानंतर कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीतच दिवस घालवला आहे.
- प्रकाश गंगाधरे, प्रभाग १०४, भाजपा
स्थायी समितीच्या बैठकीला हजेरी
शिवसेनेचे उमेदवार यशोधर फणसे यांचा दिवस कार्यमग्न गेला. सकाळी अनेक शिवसैनिकांनी त्यांची भेट घेतली़ दुपारी स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित राहून कर्तव्य पार पाडले. या परिसरातील मतदारांनी आणि विशेषकरून मिल्लतनगर येथील अल्पसंख्याक बांधवांनी जो विश्वास दाखवला, त्याबद्दल त्यांनी येथील मतदारांचे आभार मानले.
- यशोधर फणसे, प्रभाग ६०, शिवसेना
विभागात फेरफटका
दिवसभर विभागात फेरफटका मारला, परिचितांच्या गाठीभेटी घेतल्या.
- सुहास वाडकर, प्रभाग ४०, शिवसेना
दुपारी मतदान विश्लेषण, सायंकाळी पूजा
बुधवारी सकाळी ९ वाजेपर्यंत आराम केला. सातत्याने काम करत असल्याने वैचारिक थकवा आला होता़ शरीर साथ देत नव्हते. उशिरा उठल्यानंतरही काल झालेल्या मतदानाचा आढावा घेत होते. कोणत्या ठिकाणी कमी मतदान झाले?, मतदान कमी होण्याची कारणे काय? कुणाला किती मतदान झाले असेल, याचे विश्लेषण करत होते. सायंकाळी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनाही भेटी दिल्या़ दररोज मंदिरात जाण्याची सवय आहे, त्यामुळे देवाचे दर्शन घेतले.
- किशोरी पेडणेकर, प्रभाग १९९, शिवसेना
कुटुंबीयांसाठी राखीव वेळ
बुधवार सकाळपासून शिवसैनिक, कार्यकर्ते आणि परिचितांच्या गाठीभेटी घेतल्या. सायंकाळचा वेळ कुटुंबीयांसाठी राखीव ठेवून त्यांच्या सहसावात वेळ घालविला.
- देवेंद्र आंबेरकर, प्रभाग ६८, शिवसेना