मुंबई-
कोरोना, महागाईनं याआधीच सर्वसामान्यांचे हाल झालेले असताना आता रेस्टॉरंटमध्ये खाद्य पदार्थांचा आस्वाद घेणं देखील महागण्याची शक्यता आहे. राज्यातील रेस्टॉरंटमधील सर्व खाद्य पदार्थाचे दर तब्बल ३० टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय महाराष्ट्रातील रेस्टॉरंट मालक संघनेच्या (आहार) विचारधीन असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे रेस्टॉरंटमध्ये जाऊन चमचमीत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी अधिकचे पैसे ग्राहकांना मोजावे लागू शकतात.
गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल, डिझेलसह खाद्य तेलाचेही दर वाढले आहेत. त्यात भाज्यांची आवक कमी झाल्यानं दर गगनाला भिडले आहेत. दुसरीकडे कांद्याचा दरही अद्याप कमी झालेला नाही. या सगळ्याचा फटका रेस्टॉरंटमधील खाद्य पदार्थांनाही बसू शकतो. वाढती महागाई आणि लॉकडाऊनमुळे रेस्टॉरंट्स बंद असल्यानं मोठा तोटा सहन करावा लागला आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर रेस्टॉरंट मालक संघटनेनं खाद्य पदार्थांचे दर वाढविण्याचा निर्णय घेणार असल्याचं बोललं जात आहे.