मुंबईतील एलटीटी स्थानकात 'रेस्टॉरंट ऑन व्हील' सुरु; खवय्यांना घेता येणार भोजनाचा आस्वाद
By नितीन जगताप | Published: December 22, 2023 11:13 PM2023-12-22T23:13:01+5:302023-12-22T23:14:21+5:30
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आहे पहिले 'रेस्टॉरंट ऑन व्हील'
नितीन जगताप, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुंबईचे पहिले रेस्टॉरंट-ऑन-व्हील सुरु करण्यात आले होते. परंतु सीएसएमटी स्थानकाच्या पुर्नविकासासाठी ते बंद करण्यात आले होते. आता दुसरे रेस्टॉरंट ऑन व्हील मुंबईकरांसाठी आजपासून सुरू झाले आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे रेस्टोरंट ऑन व्हील तयार केल्यामुळे खवय्यांना शाही भोजनाचा आस्वाद घेता येणार आहे.
डब्याचा मुळात असलेला रंग काढून त्याची उत्तम रीतीने रंगरंगोटी केली गेली आहे, त्यामुळे ग्राहकांना एका आगळ्यावेगळ्या रेस्टॉरंटचा अनुभव घेता येणार आहे. खाद्यपदार्थांच्या किंमती कंत्राटदाराने मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून निश्चित केल्या आहेत. जेवणासाठीचे फर्निचर हे साइटवर तयार केले गेले आहे. रेस्टॉरंटमध्ये सुरक्षित अंतर लक्षात घेऊन सर्व व्यवस्था केली गेली आहे.लवकरच अशा प्रकारचे भोजनालय ठाणे आणि कल्याण सारख्या आणि इतर ठिकाणीही सुरु होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.