रेस्टॉरंट, बारचे अखेर पुन:श्च हरिओम!; ३३ टक्केच परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 01:32 AM2020-10-06T01:32:02+5:302020-10-06T01:33:05+5:30
सॅनिटायझरवर अधिक भर
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सात महिन्यांपासून रेस्टॉरंट आणि बार बंद होते. सोमवारपासून रेस्टॉरंट आणि बार सुरू झाले आहेत. मुंबईत ३३ टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी आहे. मात्र कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने अनेक रेस्टॉरंट आणि बार बंद आहेत.
याबाबत हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन आॅफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष गुरबक्ष सिंग कोहली म्हणाले की, आता ३३ टक्के क्षमतेने रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतु अनेक कामगार परराज्यात गेले आहेत. सरकारने रेल्वे, रस्ते वाहतुकीची व्यवस्था केली नाही, ते आले नाहीत. त्यामुळे कामगारांचा तुटवडा जाणवत आहे. सरोज हॉटेलचे मालक प्रीतम करेरा यांनी सांगितले की, आमचे कामगार अद्याप आले नाहीत. त्यामुळे आम्ही हॉटेल सुरू केले नाही. पार्सलची सुविधा देत आहोत. कामगार आल्यानंतर हॉटेलमध्ये जेवता येईल.
घेतली जाणारी दक्षता : ग्राहकांना प्रवेश करताना सॅनिटायझर देऊन तापमान पाहिले जाते. कर्मचारी मास्क, हँडग्लोव्हज्, फेस शील्ड घालून ग्राहकांना जेवण देतात.
एक टेबल रिकामे सोडून दुसºया टेबलवर बसण्याची व्यवस्था आहे. जेवण कागदी प्लेट, प्लास्टिकच्या भांड्यात देतात. जेवण झाल्यानंतर पुन्हा निर्जंतुकीकरण केले जाते.
स्थानिक प्रशासनाने घालून दिलेली बंधने
ग्राहकांची थर्मल गन किंवा आॅक्सिमीटरने तपासणी करावी, ज्या ग्राहकांचे तापमान ३८सें.पेक्षा जास्त आहे किंवा ताप असल्याची लक्षणे आहेत त्यांची नोंदणी करावी लागणार, मास्क आवश्यक आहे, संपर्काशिवाय सेवा देण्यावर भर द्यावा़
कामाला सकाळी लवकर येत असल्याने डबा आणणे शक्य होत नाही. त्यामुळे बाहेरचे जेवण खात असे, पण हॉटेल बंद असल्याने पार्सल घ्यावे लागत होते. पण हॉटेलमध्ये बसून खाण्याचा वेगळा आनंद आहे.
- राजू कांबळे, ग्राहक
कोरोनामुळे हॉटेल बंद असल्याने नुकसान झाले. हॉटेल सुरू झाले आहे, ती आनंदाची बाब आहे. ग्राहकांना पूर्वीप्रमाणे जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने जी नियमावली दिली आहे, तिचे काटेकोरपणे पालन करत आहोत.
- संदीप शेट्टी, सद्गुुरू हॉटेल
दर बदलले का?
कोरोनापूर्वी भाजीपाला आणि इतर वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. परंतु हॉटेल इतके दिवस बंद होते. पण तरीही तेव्हा जे दर आकारले जात होते, तेच दर सध्या आकारले जात आहेत. मेन्यू कार्डमध्ये कोणतेही बदल नाहीत.