Join us

गच्चीवर रेस्टॉरंटमुळे सुरक्षेचे आव्हान, नियम पायदळी तुडवले जात असल्याचे सिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 8:08 AM

गच्चीवरील रेस्टॉरंटला परवानगी देण्याची गेल्या सहा वर्षांपासूनची मागणी गेल्याच महिन्यात पालिका आयुक्त अजय मेहता यांनी मान्य केली. याबाबतचे धोरण विरोधकांनी पालिका महासभेत रोखून ठेवले असताना आयुक्तांनी आपल्या अधिकारात अशा उपाहारगृहांना मंजुरी दिली.

मुंबई - गच्चीवरील रेस्टॉरंटला परवानगी देण्याची गेल्या सहा वर्षांपासूनची मागणी गेल्याच महिन्यात पालिका आयुक्त अजय मेहता यांनी मान्य केली. याबाबतचे धोरण विरोधकांनी पालिका महासभेत रोखून ठेवले असताना आयुक्तांनी आपल्या अधिकारात अशा उपाहारगृहांना मंजुरी दिली. मात्र ही परवानगी मिळण्याआधीच मुंबईत अनेक ठिकाणी सुरू असलेली गच्चीवरील रेस्टॉरंट अग्नी सुरक्षेचे नियम पायदळी तुडवत असल्याचे कमला मिल कंपाउंडमधील आगीच्या घटनेने उजेडात आणले आहे. त्यामुळे गच्चीवर रेस्टॉरंटमध्ये सुरक्षेच्या नियमांचे पालन होईल, याची नियमित खात्री करणे महापालिकेसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.मुंबईत सुमारे आठशेहून अधिक ठिकाणी गच्चीवर रेस्टॉरंट आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये ही संख्या आणखी वाढली आहे. त्यामुळे हॉटेल असोसिएशनच्या मागणीनुसार गच्चीवर रेस्टॉरंटला मंजुरी देण्यात आली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा यासाठी प्रयत्न सुरू होता. त्यानुसार १ नोव्हेंबरला यावर अंमल सुरू झाला. मात्र आधीपासून सुरू असलेल्या गच्चीवरील रेस्टॉरंटमध्ये हे नियम पाळले जात नसल्याचे समोर आले आहे. या धोरणातील त्रुटी दूर न केल्यास अशी रेस्टॉरंट मुंबईसाठी घातक ठरतील हे कमला मिल कम्पाउंडमधील आगीच्या घटनेने दाखवून दिले आहे.गच्चीवरील रेस्टॉरंटला परवानगी देताना गच्चीवर कोणत्याही प्रकारचे छत बांधू नये, असा नियम आहे. मात्र मोजोज् ब्रिस्ट्रोमध्ये गच्चीवर प्लास्टीक व बांबूंचे छत बांधण्यात आले होते. त्यामुळे आग पसरली तसेच हवा कोंडून राहिल्याने निष्पाप जिवांचा बळी गेला. अन्न शिजवू नये, केवळ ग्राहकांना आणून द्यावे, गच्चीवरील संरक्षक भिंत दीड मीटरपेक्षा उंच असू नये, असा नियम आहे; मात्र या ठिकाणी हुक्का पार्लरही होता. अनेक ठिकाणी आग प्रतिबंधक यंत्रणा नादुरुस्त अथवा लावलेलीच नाही. खार, वांद्रे, वांद्रे-कुर्ला संकुल, नरिमन पॉइंट, काळाघोडा, परळ या ठिकाणी अशी अनेक ‘मोजोस्’ नियमांचे उल्लंघन करीत मुंबईकरांच्या जिवाशी खेळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या नियमांचे सक्तीने पालन होण्यासाठी महापालिकेला डोळ्यांत तेल टाकून सतर्क राहावे लागणार आहे.मुंबईत सुमारे आठशेहून अधिक ठिकाणी गच्चीवर रेस्टॉरंट आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यासाठी विशेष प्रयत्नशील होते. त्यांच्यामुळे रेस्टॉरंटची संख्या वाढत राहिली आहे.खार, वांद्रे, वांद्रे-कुर्ला संकुल, नरिमन पॉइंट, काळाघोडा, परळ या ठिकाणी अशी अनेक मोजोस् नियमांचे उल्लंघन करीत मुंबईकरांच्या जिवाशी खेळत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :मुंबई