लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईसह राज्यभरात मधल्या काळात विश्रांतीवर असलेला मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, पुढील चार ते पाच दिवस मराठवाडा आणि लगतच्या भागांत काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले. तर, मुंबईत पावसाचा जोर कायम नसला, तरी शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने मुंबईकर कंटाळले होते.
मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भात ३० सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता कायम राहील. मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक ते सोलापूरपर्यंतच्या १० व मराठवाड्यातील सर्व ८ अशा एकूण १८ जिल्ह्यांमध्ये रविवारी, सोमवारी पावसाचा जोर काहीसा कमी होईल. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरच्या १० दिवसांत पुन्हा या विभागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.