Join us

पहाटे ५ वाजेपर्यंत रेस्टोबार सुरू, कोरोनाची चिंता नाही; जल्लोषात करा नववर्षाचं स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 8:44 AM

देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध मंदिरांत मास्कसक्ती केली आहे.

मुंबई/पुणे - जगभरात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, आता सर्वांना वेध लागले आहे ते नवीन वर्षाच्या स्वागताचे. नव वर्षाच्या स्वागतापूर्वी चालू वर्षाला निरोप देण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. मित्र, वेगेवगळे गट, ग्रुप्स, संघटना ३१ डिसेंबर कसा साजरा करायचा याचं नियोजन करत आहेत. मात्र, चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाल्यामुळे भारतातही मास्क सक्तीचे निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे, यंदाच्या सेलिब्रेशनवर कोरोनाचे सावट आहे. पण, राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नवीन वर्ष धुमधडाक्यात साजरं करा, असे म्हटलं आहे. 

देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध मंदिरांत मास्कसक्ती केली आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदीही बाल वीर दिवसाच्या कार्यक्रमात मास्क परिधान करुन पाहायला मिळाले. त्यामुळे, कोरोनाचे संकट लक्षात घेता यंदाच्या ३१ डिसेंबरवर निर्बंध येणार का, अशी चिंता आणि चर्चा होती. मात्र, पुण्यात ३१ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत रेस्टोबार सुरू राहणार आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात रेस्ट्रोबार पहाटे पाच वाजेपर्यंत तर वाईन, बिअर आणि देशी मद्य विक्री दुकाने रात्री साडेदहा ऐवजी रात्री एक वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. 

कोरोनाला महाराष्ट्रातील नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही. आपल्याला धोका पत्कारायचा नाही, त्यामुळे खबरदारी घेतली जात आहे. तुम्हीही कोरोना नियमांचं पालन करत ख्रिसमस, वर्षाअखेर आणि नवीन वर्षाचं धुमधडाक्यात साजरा करा, असे आवाहनच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे. त्यामुळे, ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनची चिंता काहीशी कमी झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मॉकड्रील करत खबरदारी घेतली जाणार आहे. त्यामुळे, यंदाचं नववर्ष नागरिकांना जल्लोषात साजरं करायला मिळणार आहे. 

पोलीस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी राज्य शासनाच्या निर्णयाची पुण्यात योग्यरित्या अंमलबजावणी केली जाणार असल्याचं सांगितलं आहे. तर, हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट्सवर कोणतेही नवीन निर्बंध जारी केलेले नाहीत. उत्सवाबाबत आम्ही हॉटेल मालकांच्या बैठका घेतल्या आहेत आणि त्यांना आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे. सार्वजनिक ठिकाणी, आम्ही पोलीस बंदोबस्त ठेवणार आहोत, असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आहे. 

टॅग्स :तानाजी सावंतमुंबईनववर्षकोरोना वायरस बातम्यापुणे