बी.एच.वाडिया स्तंभाचा जीर्णोद्धार

By Admin | Published: March 20, 2016 02:52 AM2016-03-20T02:52:18+5:302016-03-20T02:52:18+5:30

मुंबईचा सांस्कृतिक वारसा केंद्र म्हणून ओळखला जाणारा फोर्ट विभाग आजही शतकभरापूर्वीइतकाच गजबजलेला आहे. काळा घोडा, हॉर्निमन सर्कल किंवा अनेक शंभर-दीडशे वर्षांपूर्वीच्या

Restoration of B.H. Wadiya Pillar | बी.एच.वाडिया स्तंभाचा जीर्णोद्धार

बी.एच.वाडिया स्तंभाचा जीर्णोद्धार

googlenewsNext

मुंबई : मुंबईचा सांस्कृतिक वारसा केंद्र म्हणून ओळखला जाणारा फोर्ट विभाग आजही शतकभरापूर्वीइतकाच गजबजलेला आहे. काळा घोडा, हॉर्निमन सर्कल किंवा अनेक शंभर-दीडशे वर्षांपूर्वीच्या येथील वास्तू आजही बदललेल्या काळातही शहराचा वारसा टिकवून आहेत. यापैकीच एक महत्त्वाच्या असणाऱ्या १८८२ साली उभारण्यात आलेल्या बोमनजी होर्मुसजी वाडिया या क्लॉक टॉवरचा जीर्णोद्धार केला जात आहे. १३४ उन्हाळे-पावसाळे पाहिलेला बझार गेट रस्त्यावरील हा टॉवर काळा घोडा असोसिएशनच्या पुढाकाराने लवकरच पुन्हा दिमाखात आपली मूळची झळाळी प्राप्त करणार आहे. ख्यातनाम स्थापत्यविशारद विकास दिलवारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम होणार आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण होणार असून अंदाजे ६५ लाख खर्च त्यासाठी येणार आहे.
बोमनजी वाडिया या पारशी समाजाच्या नेत्याच्या आणि त्यांनी केलेल्या शहराच्या कार्याप्रति कृतज्ञता म्हणून हा घड्याळाचा टॉवर उभारण्यात आला होता. ३ जुलै १८६२ रोजी त्यांचे निधन झाल्यानंतर बरोबर दहा वर्षांनी म्हणजे १८७२ साली त्यांच्या स्मरणार्थ क्लॉक टॉवर आणि सहा पाणपोया उभारण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली. या सर्व स्मारकांसाठी सोराबजी शापूरजी बेंगाली यांच्या नेतृत्वाखाली निधी जमविण्यात आला आणि १८७६ साली सहा पाणपोया लोकांसाठी खुल्या करण्यात आल्या. त्यानंतर महापालिकेचे तत्कालीन मुख्य अभियंते रेन्झी वॉल्टन यांच्या मार्गदर्शनाखाली क्लॉक टॉवरचे काम पूर्णत्वास गेले. पालिकेचे तत्कालीन आयुक्त ई.सी.के. ओलिवंट यांना लिहिलेल्या पत्रामध्ये सोराबजी यांनी यासाठी १९,४५१ रुपये खर्च आल्याचे नमूद केले आहे. तसेच याची स्थापत्य शैली प्राचीन पर्शियन असून
२५०० वर्षांपूर्वीच्या क्युनेइफॉर्म लिपीमधील अक्षरे त्याच्या तिन्ही बाजूंना कोरल्याचेही पत्रात लिहिले होते. एकेकाळी शहरात कामासाठी येणाऱ्या लोकांना वेळ दाखविणारी आणि पांथस्थांची तहान भागवणारी ही केंद्रे आपल्या
शहरी इतिहासातील महत्त्वाची पाने आहेत. रंग, पोपडे उडालेला,
मूळ झळाळी गमावलेला हा
टॉवर नव्याने अवतरल्यावर एक वारसास्थळ जपल्याचा
आपल्या सर्वांना अभिमानच वाटेल. (प्रतिनिधी)

पाणपोई-कारंजांचा जीर्णोद्धार
बोमनजी वाडिया स्तंभाप्रमाणे मिंट रस्ता आणि शहीद भगतसिंग रस्त्याच्या चौकामध्ये असणाऱ्या रुतन्सी मुळजी जेठा पाणपोईचाही जीर्णोद्घार होणार आहे. १८९४ साली आपल्या मुलाच्या स्मरणार्थ रुतन्सी मुळजी यांनी ही पाणपोई उभारली होती. त्याचप्रमाणे, हॉर्निमन सर्कलजवळ १८४२ साली बांधण्यात आलेल्या सेठ गंगालाल व्ही. मुळजी नंदलाल पाणपोईचाही जीर्णोद्धार येत्या वर्षभरामध्ये करणार असल्याचे काळा घोडा असोसिएशनचे अध्यक्ष मानेक दावर यांनी सांगितले.

कोण होते बोमनजी?
बोमनजी होर्मुसजी वाडिया हे पारशी समुदायातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व होते. १८२६ ते १८५१ इतका प्रदीर्घ काळ पारशी पंचायतीचे ते विश्वस्त होते.
त्याचप्रमाणे १८३४ पासून सलग अकरा वर्षे ‘जस्टिस आॅफ पीस’ म्हणूनही कार्यरत होते. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन, एलफिन्स्टन संस्था, जीआयपी रेल्वे अशा महत्त्वाच्या संस्थांचे संचालकपदही त्यांनी भूषविले होते.
१८५९ साली ते मुंबईचे शेरिफ होते. सामाजिक, शिक्षण, विधी, प्रशासन अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांचे स्थान आदराचे होते.

Web Title: Restoration of B.H. Wadiya Pillar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.