ठाणे : मृत जलस्रोत जिवंत करण्यासाठी जिल्ह्यातील नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा उपक्रम हाती घेतला जात आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मुरबाड तालुक्यातील कनकवीरा नदीची खोली वाढवण्यासह पात्राचे रु ंदीकरण हाती घेतले आहे. यावर, ३० कोटी रुपये खर्च होणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी गुरुवारी सांगितले. पाण्याचे नियोजन व पाणीबचतीसाठी नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने जलजागृती सप्ताहाची सुरुवात जलसंपदा विभागाने गुरुवारी केली. नियोजन भवनात पार पडलेल्या या कार्यक्रमानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या जलकलशाचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. नद्यांचे पुनरुज्जीवन या उपक्रमात प्रथम कनकवीरा नदीचे काम हाती घेतले आहे. यात नदीच्या पात्रात ठिकठिकाणी सिमेंट बांध, मजगी, लहानलहान दगडी चेक डॅम यांसारखी कामे केली जाणार आहेत. या कामाचा आराखडा आगामी दोन दिवसांत तयार होणार आहे. या नदीच्या पुनरुज्जीवनामुळे आजूबाजूच्या ११ गावांच्या ५०० हेक्टर शेतीवाडीच्या सिंचनाची क्षमता वाढणार आहे. यावर, सुमारे ३० कोटी रुपये खर्चाचा हा प्रस्ताव असून जेव्हा हे काम पूर्ण होईल, तेव्हा संपूर्ण राज्यासाठी हे एक आदर्श उदाहरण ठरणार असल्याची अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी व्यक्त केली. गेल्या वर्षभरात जलयुक्त शिवारच्या कामामुळे पाण्याचा संचय वाढल्याने एक हजार हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला लागवड झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या वेळी पर्यावरण दक्षता मंचच्या संगीता जोशी यांनी पर्यावरण संरक्षणासाठीच्या उपक्रमांचे सादरीकरण केले. आयआयटीचे प्रा. अरुण इनामदार यांनी जलसंपत्ती कशी वाचवावी, यावर मार्गदर्शन केले. जिल्हा कृषी अधीक्षक महावीर जंगटे यांनी ‘कुडशेत गावचे गावकरी जलसाक्षर झाल्याचे स्पष्ट केले. जलयुक्त शिवारमुळे पाणी उपलब्ध झाल्याने तेथील जीवनमानच बदलले आहे. या वेळी जलसंपदा विभागाच्या जलरथाचेदेखील उद्घाटन करण्यात आले. (प्रतिनिधी)
ठाण्यातील नद्यांचे पुनरु ज्जीवन
By admin | Published: March 17, 2017 5:01 AM