Join us  

मरोळ मासळी बाजाराची वेळ पूर्ववत करा, कोळी बांधवांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 4:33 PM

वरळी कोस्टल रोडच्या दोन पिलरच्या अंतराचा प्रश्न मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी लवकर सोडवला तसाच या बाजाराची वेळ देखिल  लवकर बदलण्याचे पालिका प्रशासनाला आदेश देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मनोहर कुंभेजकर

मुंबई - अंधेरी (पूर्व),अंधेरी कुर्ला रोड, पाइपलाइन, जेबी नगर येथे असलेल्या मरोळ म्युनिसिपल ड्राय फिश मार्केट (शनिवार बाजार)च्या बाजाराची वेळ बदलली आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजता बाजारात मासळी आणण्यास परवानगी दिली जाईल व शुक्रवारी दुपारी 4 वाजता माल विकण्यास परवानगी दिली जाईल असे पालिकेच्या सहाय्यक महानगरपालिका (बाजार) यांनी दि, 1 डिसेंबर 2022 पासून परिपत्रक  काढले आहे. याचे संतप्त पडसाद वेसावे, मढ, भाटी,गोराई, उत्तन, चौक, अर्नाळा आदी भागात पडले. येथील शनिवार मासळी बाजाराच्या वेळेत बदल झाल्याने स्थानिक मच्छीमारांच्या व्यवसायावर परिणाम  झाला असून रात्रीचा बाजारात मासळी विकणे म्हणजे येथील कोळी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे.

सुमारे 150 वर्षांच्या या पुरातन बाजारात मासळी विक्रेत्या कोळी महिलांना बुधवारी मध्यरात्री 3 वाजता मासळीची वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश देवून गुरुवारी सकाळी 6 वाजता मासळी विक्री करण्यास परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त अ‍ॅड. गॉडफ्रे पिमेंटा व बॉम्बे ईस्ट इंडियन असोसिएशनचे विश्वस्त अ‍ॅड. विवियन डिसोझा व रिटा डिसा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इमेल द्वारे केली आहे. वरळी कोस्टल रोडच्या दोन पिलरच्या अंतराचा प्रश्न मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी लवकर सोडवला तसाच या बाजाराची वेळ देखिल  लवकर बदलण्याचे पालिका प्रशासनाला आदेश देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या वेळेत बदल करावा या मागणीसाठी गुरुवारी सकाळी येथील मरोळ बाजार मासळी विक्रेता कोळी महिला संस्थेच्या कोळी सभासद महिलांनी कायदा हातात घेत या बाजाराचे  कुलूप तोडत मासळी बाजाराचा ताबा घेत बाजारात प्रवेश केला.लोकमत ऑनलाईन व आजच्या लोकमतमध्ये याबाबतचे वृत प्रसिद्ध होताच राज्यातील सागरी किनारपट्टीवर लोकमतचे वृत्त व्हायरल झाले. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे शिंदे गटाचे आमदार गजानन कीर्तिकर,कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमदार रमेश पाटील,स्थानिक आमदार अँड.पराग अळवणी,आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी लोकमतच्या बातमीची दखल घेतली असल्याचे सांगितले. आपण यासंदर्भात पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्याशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मरोळ बाजार मासळी विक्रेता कोळी महिला संस्थेच्या अध्यक्ष राजेश्री भानजी यांनी लोकमत ऑनलाईन आणि लोकमत मध्ये या महत्त्वाच्या प्रश्नांला वाचा फोडल्याने या संस्थेच्या 4000 कोळी महिला सभासदांच्या वतीने लोकमतचे आभार मानले आहे. बहुतेक कोळी महिला  आपली सुकी मासळी बुधवारी बाजारात आणतात आणि शुक्रवारी व शनिवारी विक्री करतात. त्या कोळी विक्रेत्या महिलांना वेळेतील बदल अनियमित आणि तर्कहीन वाटते.वेसावे, मढ, भाटी,गोराई,  उत्तन, चौक, अर्नाळा आदी भागातून येणाऱ्या कोळी विक्रेत्या महिलांना व्यवसाय करणे कठीण जाते.यामुळे बाजाराच्या वेळेत लवकर बदल केल्यास शेकडो मच्छीमारांना फायदा होईल असा विश्वास अ‍ॅड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी शेवटी व्यक्त केला. 

टॅग्स :मुंबईमच्छीमार