शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बॅनरबाजीतील फोटोंना लगाम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 05:20 AM2019-07-14T05:20:02+5:302019-07-14T05:20:54+5:30
स्वत:चे फोटो बॅनरवर झळकवणाºया शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बॅनरबाजीला लगाम घालण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कडक भूमिका घेत आचारसंहिता जारी केली आहे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई : स्वत:चे फोटो बॅनरवर झळकवणाºया शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बॅनरबाजीला लगाम घालण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कडक भूमिका घेत आचारसंहिता जारी केली आहे. शिवसेनेच्या विभागप्रमुखांची बैठक नुकतीच ‘मातोश्री’त झाली, त्या वेळी त्यांनी ही आचारसंहिता जाहीर करत शिवसेनेच्या पदाधिकाºयांना व शिवसैनिकांना सांगण्याचे निर्देश विभागप्रमुखांना दिले आहेत. तसेच बॅनरवरील फोटोवरून शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाºयांचे होणारे वाद टाळण्यासाठी शिवसेनेने स्थानिक पदाधिकाºयांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे यांच्याव्यतिरिक्त अन्य पदाधिकाºयांचे फोटो टाकण्यास बंदी घातल्याचे समजते.
शिवसेनेच्या पदाधिकाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढायला लागल्यावर, स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या कार्यक्रमाचे अथवा एखाद्या सूचनेचे बॅनर लावताना दुसºया व तिसºया फळीतील पदाधिकाºयांमध्ये टोकाचे वाद गेली काही वर्षे होत होते. हे वाद विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला हानिकारक ठरू नयेत, यासाठी पक्षाने मातोश्री येथील विभागप्रमुखांच्या बैठकीत बॅनरवरील फोटो बंदीचा कडक निर्णय घेतला. हा निर्णय पक्षाच्या पदाधिकाºयांबरोबर सर्व अंगीकृत संघटनांनाही लागू केल्याचे समजते.
येत्या १७ जुलै रोजी विमा कंपन्यांवर काढण्यात येणाºया मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी विभाग क्रमांक ४ व ५ च्या वतीने अंधेरी पूर्व येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या शिवसेना पदाधिकाºयांच्या व शिवसैनिकांच्या बैठकीत विभागप्रमुख व आमदार अनिल परब यांनी यासंबंधीचा पक्षाचा निर्णय त्यांच्या भाषणादरम्यान सांगितला.
विशेष म्हणजे या निर्णयाचे शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून जोरदार स्वागत केले. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या शिवसेनेच्या काही पदाधिकाºयांनी बॅनरबाजी करीत त्यांचे फोटो मतदारसंघात झळकविण्यास सुरुवात केल्याने उद्धव ठाकरे यांनी कडक भूमिका घेत बॅनरबाजीला आचारसंहिता लागू केल्याची सध्या जोरदार चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे.
>अनिल परब यांच्यावर मोठी जबाबदारी
गेली अनेक वर्षे निवडणूक तंत्रात पारंगत असलेल्या अनिल परब यांचा कामातील चमक पाहून पक्ष नेत्यांनी त्यांच्यावर चांदिवली विधानसभेची अतिरिक्त जबाबदारी दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत विभाग क्रमांक ४, ५ व चांदिवली विधानसभा या जागा युतीत शिवसेनेच्या वाट्याला येतील. त्या विधानसभा मतदारसंघांत आणि उद्धव ठाकरे तिकीट देतील त्या उमेदवारांना विजयी करताना दुसरीकडील विभागांत युतीचे उमेदवार विजयी कसे होतील; याची मोठी जबाबादारी अनिल परब यांच्याकडे दिल्याचे समजते.