हवाई वाहतुकीवरील निर्बंध उठविणार- हरदीपसिंग पुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 12:37 AM2021-02-23T00:37:15+5:302021-02-23T00:37:25+5:30
कोविड-१९ साथीच्या संदर्भात मंत्रालयाने हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांची माहिती पुरी यांनी यावेळी संसद सदस्यांना दिली.
मुंबई : हवाई प्रवासासाठी ठरवून देण्यात आलेले ‘भाडे टप्पे’ (फेअर बॅण्ड) हटविण्यात येतील तसेच हवाई वाहतूक क्षेत्रावरील इतर निर्बंध उठविण्यात येतील, असे नागरी हवाई वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी म्हटले आहे.आपल्या मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत पुरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, देशांतर्गत हवाई वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे. आता दररोज तीन लाख प्रवासी प्रवास करीत आहेत.
कोविड-१९ साथीच्या संदर्भात मंत्रालयाने हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांची माहिती पुरी यांनी यावेळी संसद सदस्यांना दिली. त्यांनी सांगितले की, किमान भाडे (फ्लोअर प्राइस) आणि कमाल भाडे (सिलिंग प्राइस) निश्चित करून भाडे टप्पे ठरविण्यात आले आहेत. उन्हाळ्यात हवाई वाहतुकीत वाढ होईल, तेव्हा भाडे टप्पे आणि इतर निर्बंध हटविले जातील.
पुरी यांनी बिहारसह पंजाब आणि उत्तर प्रदेशातील विमानतळ आणि उड्डाणांची माहिती याप्रसंगी समिती सदस्यांना दिली. समिती सदस्यांनी अनेक विषयांवर विशेष सूचना केल्या. या विषयांत विमानतळांचे खासगीकरण, नवे विमानतळ उघडणे, आताच्या विमानतळांचा विस्तार आणि उड्डाण प्रशिक्षण संस्था यांचा समावेश आहे, असे मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. कोरोनाकाळात हवाई वाहतूक क्षेत्राला सर्वात मोठा फटका बसला आहे.