लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या एस. विभाग असणाऱ्या भांडुप परिसरात मागील काही दिवसांपासून रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने आता या परिसरात निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. त्यानुसार, येथे दुपारी बारानंतर औषधांची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
राज्यातील कोरोनाबधितांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले. त्यानुसार, सकाळी ७ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांमधील दुकाने सुरू ठेवण्यास सरकारने परवानगी दिली. मात्र, भांडुप परिसरात सार्वजनिक ठिकाणी नागरिक नियम पाळत नसल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन काेराेना संसर्गाची भीती वाढली आहे. यामुळे एस. विभागाने भांडुप परिसरात दुपारी बारा वाजल्यानंतर औषधांची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, भांडुप परिसरात आतापर्यंत सोळा हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून सध्या तीन हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
.............................