मुंबई : मुंबईचा कोरोना खूप हुशार असून, आज रेल्वे, बस, मॉल्स, रेस्टॉरंट, पंचतारांकित हॉटेल्स, मेट्रोमध्ये कोरोना शिरत नाही का? मात्र, वेडिंग इंडस्ट्रीतच कोरोनाचा शिरकाव कसा काय होतो, असा सवाल विवाह उद्योगाशी निगडित कर्मचाऱ्यांनी केला आहे.
मंगल कार्यालयात ५० जणांची मर्यादा राज्य सरकारने घातल्यामुळे आमच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. गेली वर्षभर या उद्योगाला हजारो कोटींचा आर्थिक फटका बसला असून, हजारो गरीब कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली आहे. लग्न सोहळ्यात एकीकडे लाखो नागरिकांना रोजगार मिळत असून, दोन कुटुंबांना एकत्र आणणारा हा सोहळा आहे. ‘अब तो हमारी सून लो सरकार’ असा पुकार करत, राज्य शासनाने याचा गांभीर्याने विचार करून सदर ५० जणांची मर्यादा वाढवावी, अशी कैफियत हातात मथळे लिहिले बोर्ड घेऊन आणि मंचकावर ५ मिनिटांचे सादरीकरण या उद्योगाशी संलग्न असलेल्या कर्मचाऱ्यांनी मांडली.
अंधेरी (पूर्व) विजयनगर येथील सिंफोनी हॉलमध्ये नुकतेच या वेडिंग इंडस्ट्रीमध्ये काम करणारे कॅटरिंग, सजावट, मेजवानी (बँक्वेट्स), फळे आणि भाजीपाला पुरवठादार, किराणा दुकाने, डेअरी फार्म्स, फुलवाले, ब्युटिशियन्स, इव्हेंट मॅनेजर्स, ज्वेलर्स, बॅन्ड्स आणि म्युझिक पार्टी संयोजक, फास्ट फूड, कार सेवा प्रदाते, ढोल-वाजंत्री, डेकोरेशन, भांडी धुणारे, एलईडी लाइट्स-डीजे, वॅलेट पार्किंग आदींनी आपली कैफियत यावेळी प्रभावीपणे मांडली. आमचा आवाज राज्य सरकारपर्यंत पोहोचवा, अशी विनंती त्यांनी सादरीकरण करून मांडली.
आम्ही इतर दुसरे काम करू शकत नसल्याने, बाहेर आम्हाला कोणी नोकरी देत नाही, असे योगिता जैन व शिवाजी पवार यांनी सांगितले. या उद्योग समूहाची बॉम्बे कॅटरिंग असोसिएशन संस्था यांनी आपल्या समस्या राज्य सरकार, महापालिकेकडे यापूर्वीच मांडल्या असून, अजून आम्हाला न्याय मिळाला नसल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष योगेश चंदाराणा व प्रवक्ते ललित जैन यांनी सांगितले.