Join us

मलबार हिल परिसरातील इमारतींच्या उंचीवर निर्बंध? प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीच्या पटलावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 4:12 AM

दक्षिण मुंबईतील टोलेजंग इमारतींमुळे, गिरगाव चौपाटी, क्विन्स नेकलेस हे मुंबईचे सौंदर्यच लुप्त पावले आहे. त्यामुळे डोळ्यांचे पारणे फिटविणारा हा नजारा पुन्हा मुंबईकर व पर्यटकांना पाहता यावा, यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत.

मुंबई : दक्षिण मुंबईतील टोलेजंग इमारतींमुळे, गिरगाव चौपाटी, क्विन्स नेकलेस हे मुंबईचे सौंदर्यच लुप्त पावले आहे. त्यामुळे डोळ्यांचे पारणे फिटविणारा हा नजारा पुन्हा मुंबईकर व पर्यटकांना पाहता यावा, यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. त्यानुसार, कमला नेहरू उद्यानातील ‘व्ह्युइंग गॅलरी’च्या मार्गात अडथळा ठरणाºया मलबार हिल, मरिन ड्राइव्ह परिसरातील नव्या इमारतींच्या उंचीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या परिसरात यापुढे २१.३५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतीला परवानगी मिळणार नाही.मुंबईतील प्रसिद्ध कमला नेहरू उद्यानातून मुंबईचे हे सौंदर्य न्याहाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये दक्षिण मुंबई परिसरात उत्तुंग इमारतींची स्पर्धा सुरू झाली. याचा फटका या ‘व्ह्युइंग गॅलरी’ला बसला आहे. त्यामुळे पालिकेने अखेर येथील इमारतींच्या उंचीवर अंकुश आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, नगरविकास खात्याच्या आदेशाप्रमाणे कमला नेहरू उद्यानातील ‘व्ह्युइंग गॅलरी’मधून बॅकबे, मरिन ड्राइव्ह परिसराच्या पूर्व आणि दक्षिणेकडील दृष्टिक्षेपात येणाºया इमारतींची, ‘जीआयएस’च्या मदतीने त्रिकोणात्मक प्रतिकृती तयार करण्यात येत आहे.डी विभागाच्या विकास नियंत्रण आराखड्यावर हा परिसर चिन्हांकित करण्यात आला आहे. या परिसरात कमी उंचीची इमारत बांधताना, त्यात गच्ची, जिने, लिफ्ट, पाणी साठविण्याची टाकी व इमारतीच्या इतर वैशिष्ट्यांचा समावेश असेल, पण या सोयी ‘व्ह्युइंग गॅलरी’च्या आड येणार नाहीत, याची खबरदारीही विकासकाला घ्यावी लागणारआहे. २१.३५ मीटरहून अधिकउंचीच्या इमारतीला शासनाच्या पूर्व मान्यतेने आयुक्त परवानगी देऊ शकणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आला आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका