दक्षिण मुंबईतील इमारतींच्या उंचीवर निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 01:58 AM2017-11-09T01:58:23+5:302017-11-09T01:58:36+5:30
दक्षिण मुंबईत उभ्या राहणाºया टोलेजंग इमारतींमुळे गिरगाव चौपाटी, क्विन्स नेकलेस हे मुंबईचे सौंदर्यच झाकले गेले आहे. त्यामुळे कमला नेहरू उद्यानातील व्ह्युइंग गॅलरीच्या मार्गात अडथळा
मुंबई : दक्षिण मुंबईत उभ्या राहणाºया टोलेजंग इमारतींमुळे गिरगाव चौपाटी, क्विन्स नेकलेस हे मुंबईचे सौंदर्यच झाकले गेले आहे. त्यामुळे कमला नेहरू उद्यानातील व्ह्युइंग गॅलरीच्या मार्गात अडथळा ठरणा-या मलबार हिल, मरिन ड्राइव्ह परिसरातील नव्या इमारतींच्या उंचीवर निर्बंध घालण्यात येणार आहेत. या परिसरात यापुढे २१.३५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतीला परवानगी मिळणार नाही. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने
स्थायी समितीच्या पटलावर मांडला आहे.
मुंबईतील प्रसिद्ध कमला नेहरू उद्यानातून मुंबईचे हे सौंदर्य न्याहाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये दक्षिण मुंबई परिसरात उत्तुंग इमारतींची स्पर्धा सुरू आहे. याचा फटका या व्ह्युइंग गॅलरीला बसला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने अखेर येथील इमारतींच्या उंचीवर अंकुश आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, नगरविकास खात्याच्या आदेशाप्रमाणे कमला नेहरू उद्यानातील व्ह्युइंग गॅलरीमधून बॅकबे, मरिन ड्राइव्ह परिसराच्या पूर्व आणि दक्षिणेकडील दृष्टिक्षेपात येणाºया इमारतींची भौगोलिक माहिती पद्धतीद्वारे (जीआयएस) त्रिकोणात्मक प्रतिकृती तयार करण्यात येत आहे.
डी विभागाच्या विकास नियंत्रण आराखड्यावर हा परिसर चिन्हांकित करण्यात आला आहे. या परिसरात इमारत बांधताना त्यात गच्ची, जिने, लिफ्ट, पाणी साठविण्याची टाकी व इमारतीच्या इतर वैशिष्ट्याचा समावेश करता येईल, पण या सोयी व्ह्युइंग गॅलरीच्या आड येणार नाहीत, याची खबरदारीही विकासकाला घ्यावी लागणार आहे.
मात्र, २१.३५ मीटरहून अधिक उंचीच्या इमारतीला राज्य शासनाच्या पूर्वमान्यतेने आयुक्त परवानगी देऊ शकणार आहेत.