मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी सुरू झाली असून रविवारी आणखी ४४,३८८ नव्या रूग्णांची भर पडली तर १२ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
पुण्यात रविवारी रुग्णसंख्येचा उद्रेक पाहायला मिळाला. १८ हजार १२ चाचण्यांपैकी ४,०२९ कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. मुंबईत शनिवारी धारावीत १४७ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दादर आणि माहीम येथे अनुक्रमे २१३, २७४ एवढ्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. धारावीत पॉझिटिव्हिटी रेट २१ टक्के झाला आहे.
पुण्यात एका दिवसात तब्बल १५०० रुग्णांची वाढ झाली. एका रुग्णाचा मृत्यू झाला. पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट २२ टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णसंख्या १४ हजार ८९० इतकी झाली आहे. राज्यात सध्या २ लाख २ हजार २५९ रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात १५,३५१ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, एकूण ६५,७२,४३२ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
जिम, ब्युटी सलून निर्बंधांसह सुरू राहणार-
आता केश कर्तनालयांप्रमाणे ब्युटी सलून आणि जिमदेखील ५० टक्के उपस्थितीत सुरू राहणार आहे. शनिवारी जारी केलेल्या आदेशात जिम, स्पा, वेलनेस सेंटर आणि ब्युटी सलून बंद करण्याचे आदेश दिले होते.
...तर दारूची दुकाने बंद
दारूच्या दुकानांसह हॉटेल, रेस्टॉरंट व इतर आस्थापनांमध्ये गर्दी झाली तर त्यावर बंदी आणली जाईल. भविष्यात रुग्णालयांमध्ये भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या आणि ऑक्सिजनची मागणी वाढल्यास अधिक कडक निर्बंध लागू करावे लागतील. - राजेश टोपे, आरोग्यमंत्री