फ्लेमिंगो अभयारण्याचे निर्बंध शिथिल; बांधकामांना चालना, कांजूरची मेट्रो कारशेड संवेदनशील क्षेत्राबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 08:39 AM2021-10-20T08:39:08+5:302021-10-20T08:39:25+5:30
मुंबई : मुंबईची उपनगरे, ठाणे खाडीचे क्षेत्र आणि नवी मुंबईच्या काही भागातील फ्लेमिंगो अभयारण्याची अधिसूचना जारी करण्यात आली असून ...
मुंबई : मुंबईची उपनगरे, ठाणे खाडीचे क्षेत्र आणि नवी मुंबईच्या काही भागातील फ्लेमिंगो अभयारण्याची अधिसूचना जारी करण्यात आली असून आता बांधकामांवरील निर्बंध १० किमीवरुन ३.८९ किलोमीटरवर आणण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातील बांधकामांना चालना मिळेल. फ्लेमिंगो अभयारण्याच्या निर्बंधात कांजूरमार्गची मेट्रो कारशेडची जागाही येईल, अशी शक्यता होती. मात्र आता ही जागा पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राच्या बाहेर आली आहे.
ठाणे खाडी हा फ्लेमिंगो पक्ष्यांचा अधिवास असल्याचे या अधिसूचनेत म्हटले असून केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने ती जारी केली आहे. फ्लेमिंगो अभयारण्याचे तीन भाग करण्यात आले असून एक भाग मूळ अभयारण्याचा असून ते संरक्षित क्षेत्र असेल. दुसरा भाग पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राचा (इको सेन्सेटिव्ह झोन) आणि तिसरा भाग संलग्न क्षेत्राचा (बफर झोन) आहे. संरक्षित क्षेत्र हे ठाणे खाडी तसेच खाडीला जोडून असलेल्या खारफुटीच्या जंगलांचे आहे. पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र ठाणे खाडीच्या किनारपट्टीपासून ३.८९ किमी अंतरापर्यंत असेल. किनारपट्टीपासून पूर्व- पश्चिम दिशेला ३.८० किमी अंतरापर्यंतचे क्षेत्र ४८३०.५४५७ हेक्टर आहे. तर संलग्न क्षेत्र १० किमी अंतराचे असेल. संरक्षित व पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात ठाणे खाडीच्या परिसरासह २२ गावांच्या ८११ भागांचा समावेश आहे.
कसे असतील निर्बंध?
संरक्षित क्षेत्र तसेच पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात कुठल्याही प्रकारची बांधकामे, मासेमारी, जहाजांची ये-जा, मोठा जल-विद्युत प्रकल्प, रसायने पाण्यात सोडणे, वीटभट्टील, खडी फोडण्याचा कारखाना, खाण उद्योग, नवीन उद्योग अथवा जुन्या उद्योगांचे विस्तारीकरण, कुठल्याही प्रकारचे प्रदुषण, सॉ मिल आदींवर निर्बंध असतील.
या अभयारण्याच्या संरक्षित क्षेत्रापासून एक किमी अंतरापर्यंत किंवा पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राच्या अखेरपर्यंत (जे जवळ असेल ते) कुठल्याही प्रकारच्या बांधकामास तसेच पर्यटन केंद्र, हॉटेल, रिसॉर्टसाठी मज्जाव करण्यात आला आहे.
या भागातील स्थानिकांना मात्र त्यांच्या जमिनीवर नियम व अटींच्या अधीन राहून बांधकाम करता येईल. तसेच एक किमीबाहेर बांधकामासाठीदेखील क्षेत्रीय नियोजन आराखड्याच्या नियमांनुसारच परवानगी मिळू शकेल. याखेरीज ५० प्रकारच्या कामांबाबत निर्बंध तसेच मर्यादा घातल्या आहेत.
या निर्बंधांचे पालन होते की नाही, याची पाहणी करण्यासाठी विशेष देखरेख समिती स्थापन करण्यात आली आहे. मुख्य वनसंरक्षक तिचे अध्यक्ष असतील. ठाणे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, महापालिकेच्या सहआयुक्तांसह नऊ सदस्य समितीत असतील.
पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रे
मुंबई - मुलुंड, नाहूर, भांडूप, कांजूर, हरियाली, विक्रोळी, देवनार, मंडाले, तुर्भे, मानखुर्द
ठाणे जिल्हा (नवी मुंबईसह) : कोपरी, चेंदणी, कसबे कळवे, ऐरोली, दिवे, गोतिवली, तळवली, घणसोली, कोपरखैरणे, कसबे खैरणे, जुहू व वाशी.