आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावरील निर्बंध आणखी महिनाभर कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:05 AM2021-05-01T04:05:42+5:302021-05-01T04:05:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देशातील वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावरील निर्बंधांत वाढ करण्याचा निर्णय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशातील वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावरील निर्बंधांत वाढ करण्याचा निर्णय विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) घेतला आहे. येत्या ३१ मेपर्यंत हे निर्बंध कायम राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर २५ मे २०२० पासून देशांतर्गत विमान वाहतुकीला परवानगी देण्यात आली हाेती. परंतु, आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध कायम ठेवण्यात आले. कोरोना संक्रमण आटोक्यात येत नसल्याने निर्बंधात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली. मार्च महिन्यात डीजीसीएने काढलेल्या अधिसूचनेनुसार आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार होते. परंतु, ३० एप्रिल रोजी काढलेल्या नवीन आदेशांनुसार या निर्बंधांत आणखी महिनाभर वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, या निर्बंधांतून काही ठरावीक शेड्यूल्ड विमानांना सूट देण्यात येईल. तसेच सर्व प्रकारची मालवाहतूक कोणत्याही निर्बंधांविना सुरू राहणार असल्याचे डीजीसीएने स्पष्ट केले.