मुंबई : आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील निर्बंध ३१ जुलैपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय नागरी उड्डाण संचालनालयाने (डीजीसीए) घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या १५ महिन्यांपासून हे निर्बंध लागू आहेत.
डीजीसीएने बुधवारी जारी केलेल्या आदेशांनुसार, आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील निर्बंध ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आले आहेत. या काळात मालवाहू विमाने, वंदे भारत अभियान आणि मदतकार्यासाठीची हवाई सेवा अखंडित सुरू राहील. त्याचप्रमाणे काही ठरावीक मार्गांवर नियोजित फेऱ्या पूर्वपरवानगी तत्त्वावर चालविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्यावर्षी मार्च महिन्यात भारतात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर हवाई वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती. २५ मे २०२० पासून देशांतर्गत उड्डाणांना परवानी देण्यात आली. मात्र, आंतरराष्ट्रीय सेवेवरील निर्बंध टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आले. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र असले तरी डेल्टा प्लस विषाणूच्या धोक्यामुळे निर्बंधांत ३१ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
* सर्वसामान्यांची दुबईवारी आणखी लांबणीवर
भारतातील कोरोना स्थिती आटोक्यात येत असल्याने संयुक्त अरब अमिरातीने प्रवासबंदीबाबत पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला होता; परंतु नव्या व्हेरिएंटची धास्ती घेत भारतीय विमानांवरील निर्बंध २१ जुलैपर्यंत वाढविले आहेत. भारत-यूएईदरम्यान सेवा देणाऱ्या विमान कंपन्यांना बुधवारी तशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यूएईचे नागरिक आणि सरकारी मोहिमेवर असलेल्या व्यक्तींनाच यातून सूट देण्यात येणार आहे; परंतु त्यांनाही आरटीपीसीआर अहवाल सादर करणे बंधनकारक असून, त्याची मुदत केवळ ४८ तास इतकी असेल.
.......................................................