आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील निर्बंध ३१ ऑगस्टपर्यंत कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:06 AM2021-07-31T04:06:18+5:302021-07-31T04:06:18+5:30
मुंबई : भारतातून ये-जा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील निर्बंध ३१ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) ...
मुंबई : भारतातून ये-जा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील निर्बंध ३१ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) घेतला आहे. भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर गेल्या १६ महिन्यांपासून हे निर्बंध लागू आहेत.
'डीजीसीए'ने शुक्रवारी याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जाहीर केला. त्यानुसार, आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील निर्बंध ३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत कायम राहतील. त्यापुढील निर्णय कोरोनाच्या स्थितीनुरूप घेण्यात येईल. मात्र, मालवाहू (कार्गो) विमानांचे प्रचलन कोणत्याही बंधनांविना सुरू राहील. शिवाय, निवडक आंतरराष्ट्रीय मार्गांवर मर्यादित स्वरूपात नियोजित फेऱ्या चालविण्यात येतील. त्याचा निर्णय 'केस टू केस' तत्त्वावर प्राधिकरणाकडून घेतला जाईल.
तथापि, वंदे भारत अभियान आणि एअर बबल कराराअंतर्गत सुरू असलेली उड्डाणे वेळापत्रकानुसार प्रचलन करतील. सरकारी मापदंडांनुसार पात्र लोक त्या माध्यमातून भारतात ये-जा करू शकतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. भारताने १८ हून अधिक देशांशी एअर बबल करार केले असून, त्याअंतर्गत दोन्ही देशांतील प्रमुख विमान कंपन्यांना आठवड्यातून ठरावीक दिवस पूर्वनियोजित विमानफेरी चालविण्यास परवानगी देण्यात येते.
दरम्यान, भारताने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील निर्बंध आणखी वाढवू नयेत, असे आवाहन आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेद्वारे करण्यात आले होते. मात्र, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि काही देशांत डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण वाढू लागल्याने खबरदारी म्हणून ‘डीजीसीए’ने हा निर्णय घेतल्याचे वाहतूक तज्ज्ञांनी सांगितले. २३ मार्च २०२० पासून हे निर्बंध लागू आहेत.