मुंबई : कोरोनाच्या पॉझिटिव्हिटी रेटनुसार निश्चित करण्यात आलेले एक आणि दोन स्तर रद्द करून आता केवळ तीन, चार आणि पाच असे तीनच स्तर ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने शुक्रवारी घेतला. आजच्या निर्णयामुळे ३३ जिल्ह्यांमध्ये स्तर तीनचे निर्बंध लागू झाले आहेत.
आतापर्यंत एक आणि दोन स्तरांत असलेल्या जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या स्तरातील निर्बंध राहतील. गेल्या आठवड्यात राज्यातील २५ जिल्हे हे स्तर एकमध्ये होते. याशिवाय आठ जिल्हे आधीपासूनच स्तर तीनमध्ये होते. आता या सर्व जिल्ह्यांमध्ये स्तर तीनमधील निर्बंध असतील. डेल्टा व्हेरिएंटचा शिरकाव आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी शिथिलता मिळवायची असेल तर एक आठवड्याचा कमी होणारा पॉझिटिव्हिटी रेट बघायचे. आता तो दोन आठवड्यांचा बघितला जाईल. अधिक निर्बंध लावायचे असतील तर मात्र दोन आठवडे वाट बघण्याची गरज नसेल. जिल्हा प्रशासन गरजेनुसार निर्णय घेऊ शकेल.
स्तर तीनमध्ये आता हे जिल्हे असतील
मुंबई शहर व उपनगर, नाशिक, उस्मानाबाद, सांगली, बीड, पालघर, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, गडचिरोली, ठाणे, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर,नागपूर, नांदेड, नंदुरबार, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या ३३ जिल्ह्यांमध्ये स्तर तीनमधील निर्बंध असतील.राज्यात स्तर दोन आणि पाचमध्ये एकही जिल्हा नाही. स्तर चारमध्ये रायगड, रत्नागिरी व कोल्हापूर हे जिल्हे आहेत.
दुकानांसाठी काय आहेत नियम?
तिसऱ्या स्तरात अत्यावश्यक दुकाने आणि आस्थापना सर्व दिवशी दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असेल. अत्यावश्यक नसलेली दुकाने आणि आस्थापना सोमवार ते शुक्रवार या दिवसांत दुपारी ४ पर्यंत खुली ठेवता येतील. तिसऱ्या स्तरावरील निर्बंध आणखी कडक करायचे असल्यास स्थानिक प्रशासन त्याबाबत निर्णय घेऊ शकेल.
मॉल्स, थिएटर, मल्टिफ्लेक्स बंद
तिसऱ्या स्तरावरील निर्बंधात रेस्टॉरंट, हॉटेल्स यांना ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी आहे. वीकेंडला हॉटेल सुरू राहणार नाहीत. त्या वेळी होम डिलिव्हरी करण्यास परवानगी असेल. मॉल्स, थिएटर, मल्टिफ्लेक्स बंद राहतील.
जीम, सलूनसाठी काय असतील वेळा?
आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करता येईल. जीम, सलून आणि स्पा दुकाने ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. निकष बदलले आतापर्यंत पॉझिटिव्हिटी रेट काढण्यास सर्व प्रकारच्या चाचण्यांची संख्या गृहीत धरली जात होती. आता फक्त आरटीपीसीआर चाचण्यांचीच आकडेवारी बघितली जाईल.
तिसऱ्या लाटेत राज्यातील ५० लाख नागरिकांना संसर्गाची भीती? - डॉ. राजेंद्र शिंगणे
संभाव्य तिसऱ्या लाटेत राज्यातील जवळपास ५० लाख नागरिक संक्रमित होण्याची भीती असून मध्यंतरी करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर आनुषंगिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
डेल्टा विषाणूमुळे राज्यात पहिला बळी
डेल्टा प्लसमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ८० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला. डेल्टामुळे झालेला राज्यातील हा पहिलाच मृत्यू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. डेल्टा प्लसवर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे, असे सांगतानाच राज्यात पुन्हा लॉकडाऊनचा सरकारचा विचार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राला अधिक काळजी घ्यावी लागेल
महाराष्ट्राला लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करताना जास्त सावध राहावे लागेल, असे आरोग्य मंत्रालयातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव म्हणाले की, रायगड, सांगली, सिंधुदुर्ग, पुणे, रत्नागिरी, सातारा, पालघर आणि उस्मानाबादेत आजही संक्रमणाचा दर पाच ते नऊ टक्के आहे. म्हणून तेथे जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.