मुंबई : मुंबई बँकेच्या वाढत्या व्यावसायिक क्षमता आणि प्रशासकीय कामकाजावर विश्वास व्यक्त करत कलम ३५-ए अंतर्गत लादलेले निर्बंध भारतीय रिझर्व्ह बँकेने १४ जूनपासून हटविल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी, रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने आॅनलाइन तसेच डिजिटल बँकिंग सुविधा ग्राहकांना पुरविणे मुंबई बँकेला शक्य होणार आहे. त्यामुळे मुंबई बँकेचे व्यवहार अधिक गतिमान होऊन बँकेच्या व्यवसायात अधिक वाढ होईल, असा विश्वास बँकेचे अध्यक्ष व आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे.दरेकर यांनी सांगितले की, सद्य:स्थितीत बँकेच्या ठेवी ५ हजार ७८ कोटींवर असून खेळते भांडवल सुमारे ६ हजार ६०० कोटींवर आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या आर्थिक क्षमतेत आणि व्यवहारात चांगली सुधारणा केली आहे. मुंबईकरांचा विश्वास वृद्धिंगत करत बँकेने गेल्या वर्षभरात ठेवींमध्ये सुमारे १ हजार कोटींची वाढ केली आहे. तर बँकेचा कर्ज व्यवहारही ७०० कोटींनी वाढला आहे. बँकेच्या आर्थिक प्रगतीच्या वाटचालीची दखल घेत रिझर्व्ह बँकेने कलम ३५-ए अंतर्गत घातलेले निर्बंध अखेर उठविले आहेत. यासंदर्भातील परिपत्रक रिझर्व्ह बँकेने १४ जून रोजी प्रसिद्ध केल्याचेही दरेकर यांनी सांगितले.सन २००३ पासून असलेल्या या निर्बंधांमुळे बँकेला आॅनलाइन बँकिंग सुविधेचा फायदा ग्राहकांना देता येत नव्हता. मात्र रिझर्व्ह बँकेने निर्बंध हटविल्याने, म्युच्युअल फंड आणि सरकारी रोखे अधिक ताकदीने गुंतवणूक करण्याचे जास्तीत जास्त पर्याय मुंबई बँकेला आता उपलब्ध होतील. बँकेचा महसूल वाढेल, परिणामी नफ्यामध्ये सकारात्मक वाढ होईल. तसेच हे निर्बंध काढल्यामुळे बँकेला इंटरनेट बँकिंग सुविधेसाठी रिझर्व्ह बँकेची मान्यता सहजपणे मिळू शकते. त्यामुळे आॅनलाइन व डिजिटल बँकिंग क्षेत्रात आता मुंबई बँक अधिक कार्यक्षमपणे ग्राहकांना सेवा पुरवेल, अशी माहितीही दरेकर यांनी दिली.
मुंबई बँकेवरील निर्बंध रिझर्व्ह बँकेने हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 2:30 AM