लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ओटीटीसारख्या प्लॅटफॉर्मवर नग्नता व गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात दाखविण्यात येते. ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखविण्यात येणाऱ्या वेबसिरीज, सिनेमा व मालिकांवर सेन्सॉरचे कोणतेही नियंत्रण नसते. लहान मुलांवर याचा मोठा परिणाम होतो. सरकारने हल्लीच ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेन्टविषयी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवरील हे निर्बंध योग्यच असल्याचे रिस्पॉन्सिबल नेटिझन्सचे म्हणणे आहे. ‘सोशल मीडिया - ओटीटी प्लॅटफॉर्म आणि त्याचा लहान मुलांवरील परिणाम’ यासंदर्भात ‘टीम रिस्पॉन्सिबल नेटिझन्स’च्या वतीने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
ओटीटी प्लॅटफॉर्मला देण्यात आलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांमुळे आता नव्याने बनविण्यात येणाऱ्या वेबसिरीजच्या दिग्दर्शक तसेच लेखकांवर काही बंधने आली आहेत.
नव्या नियमानुसार आपण वयोगटानुसार काय पाहावे याच्या कॅटेगरी ठरविण्यात आल्या आहेत. यामुळे नग्नता व गुन्हेगारी यांचे प्रमाण कमी होईल, असे मत या वेळी मांडले गेले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण एकमेकांशी जोडले जाऊ शकतो. मात्र, हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवादेखील मोठ्या प्रमाणात पसरविल्या जात आहेत.
अफवा पसरल्यानंतर त्या अफवेचा पहिला संदेश कोणी तयार केला होता. याबद्दल माहिती मिळायला हवी. व्हॉट्सॲपद्वारे अफवा पसरविण्याचे प्रमाण जास्त आहे. यामुळे मॉब लिंचिंगसारख्या घटनादेखील वाढत आहेत.
हल्लीच यूट्युब विरुद्ध टिकटॉक अशी भांडणे सोशल मीडियावर रंगलेली पाहायला मिळाली. या भांडणांमध्ये एकमेकांवर मोठ्या प्रमाणात वैयक्तिक टीकाटिप्पणी झाली. हे पूर्णपणे चुकीचे असून यामुळे एखाद्यावर मानसिक दडपण येऊ शकते. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वेबसाईट आपल्यावर लक्ष ठेवून असतात. त्यांच्यापासून आपण सावध असायला हवे, असे मत या वेळी अनेकांनी व्यक्त केले.