होळीवरील निर्बंधांमुळे रंगविक्रेत्यांवर संक्रांत; ग्राहकांनीही फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:07 AM2021-03-26T04:07:38+5:302021-03-26T04:07:38+5:30
मुंबई : फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागल्याने प्रशासनाने कठोर निर्बंध लादले आहेत. परिणामी यंदाची होळीदेखील कोरोनाच्या ...
मुंबई : फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागल्याने प्रशासनाने कठोर निर्बंध लादले आहेत. परिणामी यंदाची होळीदेखील कोरोनाच्या सावटाखाली साजरी करावी लागणार आहे. होळी व रंगपंचमी साजरी करण्यावर प्रशासनाने यंदा निर्बंध लादले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी यंदाची होळी कोरडी तर आहेच; परंतु रंगविक्रेते तसेच पिचकारी व फुगेविक्रेत्यांवर देखील संकट ओढवले आहे.
मुंबईत दरवर्षी होळी व रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यासाठी दुकानांमधून सजावटीच्या पताका रंग, फुगे व पिचकाऱ्या विकत घेतल्या जातात. यामुळे मुंबईतील प्रत्येक दुकानातून हजारोंची उलाढाल होते. मात्र यंदा ग्राहकांनी होळी व रंगपंचमीची खरेदी करण्याकडे पाठ फिरवल्याने रंग विक्रेते चिंतेत आहेत.
होळी-रंगपंचमी हा सण एकमेकांना रंग लावून तसेच नाचगाण्यांवर थिरकून साजरा केला जातो. मुंबईत अनेक इमारतींमध्ये, चाळींमध्ये तसेच रिसॉर्ट व मैदानांमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यात सहभागी होण्याकरिता हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहतात. हा सण साजरा करताना एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर राहत नसल्याने प्रशासनाने या सणावर निर्बंध लादले आहेत.
यामुळे अनेक जण होळीच्या दिवशी घराबाहेर न पडता घरातच होळी साजरी करणार आहेत. यामुळे नागरिकांनी यंदा रंगखरेदी केलेली नाही.
प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी असली तरीदेखील होळीला प्लास्टिकच्या पिशव्यांना मोठी मागणी असते. मात्र यंदा प्लास्टिकच्या पिशव्या उपलब्ध असूनही लहान मुलांनी त्या खरेदी केल्या नसल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.
मनोज शिरसाट (रंग विक्रेता, दादर) - मागील वर्षी लॉकडाउनच्या आधी रंगपंचमी आल्याने काही प्रमाणात रंग खरेदी झाली. यामुळे अर्ध्याहून जास्त वस्तू विकल्या गेल्या. मात्र यंदा होळी आणि रंगपंचमी वर कोरोनाचे सावट असल्याने प्रशासनाने या सणावर निर्बंध घातले. परिणामी आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला.
रामदास ठाकूर (रंग विक्रेता, चेंबूर) - होळी आणि रंगपंचमीला लहान मुले पिचकारी व फुगे यांची खरेदी मोठ्या प्रमाणात करतात. यंदा चीनमधून होळीला लागणाऱ्या वस्तू आल्या नाहीत. त्याचप्रमाणे प्रशासनाने निर्बंध घातल्यामुळे यंदा दुकानात मागील वर्षीच्या पिचकाऱ्या व रंग विकण्यास ठेवले आहेत; परंतु ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे त्या वस्तू देखील विकल्या जात नाहीत.