Join us  

थर्टीफर्स्टच्याही ‘आवाजा’वर निर्बंध

By admin | Published: January 05, 2016 2:53 AM

सण व मिरवणुकांबरोबरच आता ख्रिसमस व ३१ डिसेंबरच्या पार्ट्यांमधील ध्वनिप्रदूषणावरही निर्बंध घाला, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे;

मुंबई : सण व मिरवणुकांबरोबरच आता ख्रिसमस व ३१ डिसेंबरच्या पार्ट्यांमधील ध्वनिप्रदूषणावरही निर्बंध घाला, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे; तसेच ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक असलेली १ हजार ८४३ ध्वनिमापक यंत्रेही येत्या तीन महिन्यांत पोलिसांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले आहेत. सणांच्या काळात ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात येते आणि राज्य सरकार कारवाई करत नाही, अशा आशयाची जनहित याचिका ठाण्याचे रहिवासी महेश बेडेकर यांनी उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. सी.व्ही. भडंग यांच्या खंडपीठापुढे होती. सोमवारच्या सुनावणीवेळी खंडपीठाने ध्वनिप्रदूषणाचे नियम केवळ सण, मिरवणुकांपुरतेच मर्यादित न ठेवता ख्रिसमस पार्टी आणि ३१ डिसेंबरच्या पार्ट्यांनाही लागू करावेत, अशी सूचना राज्य सरकारला केली. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, असेही खंडपीठाने म्हटले. सुनावणीवेळी खंडपीठाने पोलिसांच्या नाकर्तेपणावरही बोट ठेवले. नवरात्रौत्सव आणि दिवाळीदरम्यान ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन न होणे शक्य नाही. असा दावा राज्य सरकारही करू शकत नाही. असे असतानाही या काळात पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर व अन्य काही जिल्ह्यांत नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एकही तक्रार नोंदवण्यात आली नाही, या मुद्द्यावर खंडपीठाने बोट ठेवले. ध्वनिप्रदूषण नियमांची अंमलबजावणी करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. आवाजाची पातळी मर्यादित आहे की नाही, हे पाहण्याचे, योग्य कारवाई करण्याचे काम पोलिसांचे आहे, अशा शब्दांत खंडपीठाने पोलिसांना खडसावले. (प्रतिनिधी)