ज्ञानदेव वानखेडे यांच्या मागणीवर २२ नोव्हेंबरला निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 05:58 AM2021-11-19T05:58:01+5:302021-11-19T05:58:31+5:30
मानहानी दावा; मलिक यांना बदनामीकारक विधाने करण्यास मनाई करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना वानखेडे कुटुंबीयांबाबत बदनामीकारक विधाने करण्यास मनाई करावी, अशी अंतरिम मागणी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मानहानी दाव्यात केली आहे. या अंतरिम मागणीवरील निकाल उच्च न्यायालय २२ नोव्हेंबर रोजी देणार आहे. गुरुवारच्या सुनावणीत न्या. माधव जामदार यांच्या एकलपीठाने नवाब मलिक व ज्ञानदेव वानखेडे यांनी आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ सादर केलेली अतिरिक्त कागदपत्रेही दाखल करून घेतली.
मलिक यांना वानखेडे कुटुंबीयांची बदनामी करणारी विधाने करण्यापासून व बदनामीकारक पोस्ट समाजमाध्यमांवर पोस्ट करण्यास कायमची मनाई करावी तसेच नुकसानभरपाई म्हणून सव्वा कोटी रुपयांची मागणी वानखेडे यांनी दाव्याद्वारे केली तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत त्यांना समाजमाध्यमांवर व पत्रकार परिषदेत वानखेडे कुटुंबीयांविरोधात काहीही न बोलण्याचे व पोस्ट करण्याचे अंतरिम मनाई आदेश द्यावेत, अशीही मागणी वानखेडे यांनी केली आहे.
गुरुवारच्या सुनावणीत अतिरिक्त कागदपत्रे स्वीकारताना न्या. जमादार यांनी म्हटले की, कोणत्याही पक्षाने सोमवारपर्यंत (२२ नोव्हेंबर) पर्यंत अधिक कागदपत्रे दाखल करू नयेत. अंतरिम आदेश २२ नोव्हेंबरला संध्याकाळी ५:३० वाजता देण्यात येईल. अतिरिक्त तीन कागदपत्रे दाखल करण्याची परवानगी मिळावी, यासाठी नवाब मलिक यांनी मंगळवारीच न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाच्या परवानगीनंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचे शाळा प्रवेश अर्ज, प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखल सादर केला. त्यात समीर वानखेडे यांचा धर्म मुस्लिम असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याशिवाय मलिक यांनी आरोग्य अधिकाऱ्याचा एक जाहीरनामाही सादर केला. त्यात ज्ञानदेव वानखेडे यांनी स्वतःचे दाऊद हे नाव बदलून ‘ज्ञानदेव’ असे ठेवले. तर ज्ञानदेव यांनीही काही कागदपत्रे न्यायालयात सादर केली. त्यांनी स्वतःच्या जातीचा दाखला न्यायालयात सादर केला. त्यात ते ‘महार’ जातीचे असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे तसेच मुंबई महापालिकेने समीर वानखेडेंचा दिलेला जन्मदाखलाही सादर करण्यात आला. त्यात समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव ज्ञानदेव कचरूजी वानखेडे, असे नमूद करण्यात आले आहे.
क्रांती रेडकर यांचे नवाब मलिकांच्या आरोपाला ट्विट करत उत्तर
nमंत्री नवाब मलिक यांनी नुकतेच समीर वानखेडे यांचा शाळा सोडल्याच्या दाखल्याचा फोटो ट्विट केला होता. या ट्विटमध्ये त्यांनी समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचे तसेच त्यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचा दावा केला होता. याला उत्तर देत क्रांती वानखेडे यांनी समीर वानखेडे यांचा जन्माचा दाखला ट्विट केला आहे. यात समीर वानखेडे हे हिंदू असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
nनवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या सेंट जोसेफ व सेंट पॉल शाळेच्या दाखल्यांमध्ये समीर वानखेडे यांचा धर्म मुस्लिम असल्याचा उल्लेख आहे. तसेच जातीचा रकानाही रिकामा असल्यामुळे ते प्रथमदर्शनी मुस्लिम असल्याचे दिसून येत आहे.
nक्रांती रेडकर यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हणाल्या की, समीर वानखेडे यांची बदनामी करण्यासाठी काहीजणांकडून चुकीची व अर्धवट माहिती प्रसारित करत आहेत. १९८९ मध्येच ज्ञानदेव वानखेडे यांनी यातील चुका दुरुस्त केल्या आहेत. तसेच शाळांनीदेखील पडताळणी करत ही दुरुस्ती स्वीकारली आहे.