Join us

निकालाच्या सूत्राने उडवली विद्यार्थ्यांची झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 4:06 AM

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाकडून बारावी परीक्षेचे गुण दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षांच्या आधारे दिले जाणार आहेत. राज्य ...

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाकडून बारावी परीक्षेचे गुण दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षांच्या आधारे दिले जाणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाने अकरावीच्या गुणांना सीबीएसईप्रमाणे ३० टक्के वेटेज दिले तर अंतिम गुणांकनात घसरण होण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे. स्वाध्याय, गृहपाठ, चाचण्या यांच्याकडे लक्ष न दिल्याने अकरावीचे वर्ष विश्रांती वर्ष (रेस्ट इअर) म्हणून गेल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मूल्यांकनाच्या ३०-३०-४० या फाॅर्म्युल्यामध्ये टक्केवारीत घसरण होण्याची भीती विद्यार्थ्यांसह शिक्षकांतूनही व्यक्त होत आहे.

नीट, जेईई, सीईटी अशा विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशपूर्व परीक्षांची तयारी करताना अकरावी अभ्यासाकडे विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होते. अकरावीचे वर्ष रेस्ट इअर समजून बारावीकडे लक्ष केंद्रित केल्याने परिणामी दहावीपेक्षा अकरावीत गुण कमी मिळतात. आता अकरावीचे ३० टक्के गुण मूल्यमापनात ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी मूल्यांकनाच्या नव्या सूत्राची धास्ती घेतली आहे. यात अभ्यासू विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याची भीतीही शिक्षकांतून व्यक्त केली जात आहे, तर अकरावीचे मूल्यांकन करताना त्याचे अभिलेखेही बोर्डाला द्यायचे असल्याने शाळा, महाविद्यालयांकडून बारावीतील विद्यार्थ्यांकडून अकरावीचे पेपर, प्रात्यक्षिक, सराव पेपर लिहून घेण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत.

बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची चिंता असली तरी अनेक विद्यार्थी दहावीच्या निकालानंतर थोडे निर्धास्त झाले आहेत आणि आपला निकाल हा चांगलाच लागणार असल्याची खात्रीही त्यांना झाली आहे. मात्र, बारावी निकालानंतरच्या पदवी प्रवेशाची खरी चिंता लागून राहिली आहे. बारावीनंतरचे प्रवेश कसे आणि केव्हा होणार? त्यासाठी वेगळ्या सीईटी होणार का? त्याची तयारी आणखी वेगळ्या पद्धतीने करावी लागणार का ? असे विविध प्रश्न आता विद्यार्थी विचारू लागले आहेत.

३० टक्के सूत्र गणित बिघडविणार !

बारावीच्या निकालात दहावीच्या निकालाला जास्त वेटेज द्यायला पाहिजे होते. किमान ५० टक्के तरी वेटेज दहावीला असायला पाहिजे होते. कारण, अकरावी दुर्लक्षित राहिली. बारावीचे वर्ष कोरोनात गेले. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणात या सूत्राने टक्केवारी कमी मिळण्याची शक्यता आहे.

- प्रेरणा कळंबे, विद्यार्थिनी

कोरोनामुळे परीक्षा झाली नाही, हे विद्यार्थिहिताचे आहे. दहावीला चांगले गुण होते. मात्र, अकरावीकडे बारावीच्या तयारीत दुर्लक्ष केले. त्यामुळे टक्केवारी घसरण्याची भीती वाटते; पण हरकत नाही. पुढील परीक्षांच्या तयारीचा अभ्यास करत आहोत.

- क्रिश बुलानी, विद्यार्थी

विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा

अकरावीत नियमित वर्ग झाले असल्याने मूल्यांकनात विद्यार्थ्यांना अडचणी येणार नाहीत. निकालाच्या टक्केवारीवर मूल्यांकनाच्या फार्म्युल्याचा परिणाम होईल असे वाटत नाही. वस्तुनिष्ठ वेटेज मिळेल. निकालाची चिंता विद्यार्थ्यांनी करू नये. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता पुढील परीक्षांवर फोकस ठेवला पाहिजे. अभ्यास नियमित सुरू ठेवला पाहिजे.

- निरंजन ताकवले, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक

चौकट

मुंबई विभाग - बारावी विद्यार्थी संख्या

मुले - १५१६९९

मुली - १४१०३९

तृतीयपंथी - ३०

एकूण २९२७६८