MHT-CET चा निकाल लागला पण पाहताच येईना, साईटचा सर्व्हर सतत डाऊन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 07:19 PM2019-06-04T19:19:16+5:302019-06-04T19:21:01+5:30
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारीच प्रसिद्ध करण्यात आला आहे.
मुंबई - राज्य सामायिक परीक्षा विभागातर्फे राज्यभरात 2 ते 13 मे या कालावधीत एमएच-सीईटी परीक्षा घेण्यात आली. या परिक्षेचा निकाल मंडळाने जाहीर केल्याप्रमाणे 4 जून रोजी दुपारी इंटरनेटवर प्रसिद्ध करण्यात आला. मात्र, सातत्याने वेबसाईटचा सर्व्हर डाऊन असल्याने, वेबसाईटवर लोड असल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहताना अडचणींचा सामना करावा लागला आहे. कित्येक विद्यार्थ्यांना सायंकाळी 7 वाजेपर्यंतच आपला निकालच पाहता आला नाही.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारीच प्रसिद्ध करण्यात आला आहे. एमएचटी- सीईटीच्या अधिकृत स्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार होता. निकालामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्व विषयाचा पर्सेंटाईल स्कोअर आणि पीसीएम आणि पीसीबी ग्रुपचा स्कोअर स्वतंत्रपणे दिला जाईल, असेही प्रवेश परीक्षा कक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, संबंधित साईटला सातत्याने कनेक्शन प्रॉब्लेम असल्याने तो निकाल पाहताना विद्यार्थ्यांना अडचण येत आहे. राज्यातून खुल्या गटात (पीसीबी) सोलापूरचा विनायक गोडबोले तर एससी गटातून (पीसीएम) आदर्श अभांगे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. विभागाकडून याबाबत जाहीर करण्यात आले आहे. मात्र, सायंकाळी 7 वाजेपर्यंतही बहुतांश विद्यार्थ्यांना केवळ साईटचा सर्व्हर डाऊन असल्याने, किंवा साईटच ओपन होत नसल्याने आपला निकाल पाहता आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनी शिक्षण विभागाबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. तर, केवळ ऑनलाईन पद्धतीनेच हा निकाल पाहता येणार असल्याने, किती वेळ वाट पाहायची असा प्रश्नही पालकांकडून विचारला जात आहे.
ऑनलाईन पध्दतीने जाहीर झालेल्या निकालावर विद्यार्थ्याचे नाव, त्याच्या पालकाचे नाव, आईचे नाव यांचा उल्लेख केला जाईल. तसेच निकालावर संबंधित विद्यार्थ्याचे छायाचित्रही असणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित विद्यार्थ्याने किती वाजता निकाल डाऊनलोड करून घेतला, याबाबतची माहितीही दिली जाईल, असे प्रवेश परीक्षा कक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्याच्या प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेसाठी राज्यातून 4 लाख 13 हजार 284 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.त्यातील 3 लाख 92 हजार 304 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले.मागील वर्षी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेस 4 लाख 35 हजार 606 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 4 लाख 19 हजार 408 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
या साईटवर निकाल पाहाता येईल.
www.mahacet.org
www.mhtcet2019.mahaonline.gov.in