नवी मुंबईचा निकाल ९३ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2015 12:20 AM2015-05-28T00:20:10+5:302015-05-28T00:20:10+5:30
नवी मुंबई महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेबु्रवारी-मार्च महिन्यात घेतलेल्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल बुधवारी जाहीर झाला.
नवी मुंबई : नवी मुंबई महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेबु्रवारी-मार्च महिन्यात घेतलेल्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल बुधवारी जाहीर झाला. यामध्ये नवी मुंबईचा निकाल ९३.४३ टक्के लागला असून चार कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात वाशीतील फादर अॅग्नेल, सेंट मेरी, नेरु ळमधील सेंट झेविअर्स, पेस ज्यु. कॉलेज या महाविद्यालयांचा समावेश आहे.
२०१४-१५ या शैक्षणिक वर्षात नवी मुंबईतून १२ हजार ९४७ विद्यार्थी बारावी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १२ हजार ८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागातील सात हजार १८ मुले तर पाच हजार ९२९ मुली परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी सहा हजार ३९० मुले, तर पाच हजार ६९१ मुली उत्तीर्ण झाल्या. सध्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी असल्याने कोणत्या महाविद्यालयात कोण प्रथम आले, हे शोधण्यात अडचणी येत होत्या. सध्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन निकाल पहायला मिळाला असून निकाल पुस्तिका हातात आल्यानंतरच महाविद्यालयांना आपला निकाल कळू शकेल.
रायगड जिल्ह्याचा निकाल ९०.३६ टक्के लागला असून सर्वच तालुक्यांत मुलींनी बाजी मारली आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी निकाल ४७.०५ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील अलिबाग, पनवेल, मुरुड, माणगांव, श्रीवर्धन, म्हसळा आणि महाड या सात तालुक्यांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा अधिक तर उरण, कर्जत, सुधागड, पेण, रोहा, तळा व पोलादपूर तालुक्याचा निकाल ८० टक्क्यांपेक्षा अधिक लागला आहे. केवळ खालापूर तालुका काहीसा पिछाडीवर असून तेथे ७६.९२ टक्के निकाल लागला आहे. (प्रतिनिधी)