जुन्या शाळाच बंद पडल्याने गुणपत्रिका मिळेनात
सीमा महांगडे
मुंबई : सतरा नंबरचा अर्ज भरून दहावी-बारावीच्या परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना यंदाच्या अंतर्गत मूल्यमापन प्रक्रियेमुळे फटका बसण्याची शक्यता असून, त्यांच्या निकालावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. हे विद्यार्थी कायम संपर्कात नसल्याने, शिक्षक, मुख्याध्यापकांना त्यांचा शोध घ्यावा लागत आहे, तर दुसरीकडे या विद्यार्थ्यांच्या मूळ गुणपत्रिका उपलब्ध नसल्याने त्यांचा निकाल तयार कसा करायचा, असा पेच निर्माण झाला आहे.
बाहेरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र असलेल्या शाळांकडेच या विद्यार्थ्यांच्या निकालाची जबाबदारी आहे. त्यामुळे शाळेतील नियमित विद्यार्थ्यांबरोबरच बाहेरून बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घ्यावा लागत आहे. त्यांचे व्हॉट्सअॅप ग्रुप करण्यात आले आहेत. मात्र, तेथेही विद्यार्थी प्रतिसाद देतातच, असे नाही. त्यांचा निकाल हा स्वाध्याय पुस्तिकांवर अवलंबून आहे. मात्र, विद्यार्थी शोधून स्वाध्याय पुस्तिका घेण्यात अडचणी येत आहेत, असे मुख्याध्यापकांनी सांगितले.
अशा विद्यार्थ्यांचे मूल्यांकन वर्षानुवर्षे जुन्या गुणपत्रिकांवरून करणे अयोग्य आहे. यामुळे शिक्षणाची ओढ असणाऱ्या आणि शैक्षणिक भविष्य पुन्हा घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक व्यक्त करीत आहेत.
...यामुळे येणार निकालात अडचण
१. शाळाच बंद झाली!
हशीम कुरेशी यांनी २००० साली इयत्ता सहावीत असताना आपली शाळा कुर्ला हायस्कूल सोडले. यंदा दहावीचा १७ नंबरच अर्ज भरला. अंतर्गत मूल्यमापनामुळे ते अडचणीत आले. निकालासाठी त्यांना केंद्रात सहावीची मूळ गुणपत्रिका जमा करायची आहे, परंतु त्यांच्याकडे ती नाही. ते यापूर्वी ज्या मराठी माध्यमाच्या शाळेत होते, ती शाळा काही वर्षांपूर्वी बंद झाली असून, आता आपली सहावीची मूळ गुणपत्रिका मिळविण्याचा कोणताच पर्याय त्यांच्याकडे नाही.
२. गुणपत्रिका भिजली
साकीनाक्याच्या गौतम गायकवाड यांनीही सतरा नंबरचा अर्ज भरला आहे. आठवीतून शाळा सोडलेल्या गौतम यांची गुणपत्रिका घर लहान असल्याने पावसाच्या पाण्यात भिजून गहाळ झाली. ते ज्या प्रेरणा हायस्कूलमध्ये शिकत होते, ती शाळा पटसंख्येच्या कारणस्तव बंद पडल्याने त्यांच्याकडे गुणपत्रिका नाही. जुनी गुणपत्रिका नसल्याने शिक्षण पूर्ण करता येणार नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
* मूळ गुणपत्रिका गरजेचीच
सतरा नंबरचा अर्ज भरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या मागील इयत्तेचे गुण लक्षात घेऊन अंतर्गत मूल्यमापन होणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या मूळ गुणपत्रिका नसणार किंवा आवश्यक अभिलेख उपलब्ध नसतील, त्यांचे निकाल केंद्रांकडून तयार होणार नाहीत. यामधील अनेक विद्यार्थी हे बोगसही असू शकतात.
- दिनकर पाटील, अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक राज्य शिक्षण मंडळ
----------------------