Join us

सतरा नंबरच्या निकालाची वाऱ्यावर वरात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 4:06 AM

जुन्या शाळा बंद पडल्याने गुणपत्रिका मिळेना; दहावीच्या निकालासाठीचे अंतर्गत मूल्यमान अवघडसीमा महांगडेमुंबई : आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ...

जुन्या शाळा बंद पडल्याने गुणपत्रिका मिळेना; दहावीच्या निकालासाठीचे अंतर्गत मूल्यमान अवघड

सीमा महांगडे

मुंबई : आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने हशिम कुरेशी यांनी २००० साली सहावीत असताना कुर्ला हायस्कूल सोडले. मधल्या काळात त्यांना घराची जबाबदारी आणि इतर कारणामुळे पुन्हा शाळेत जाता आले नाही. दरम्यान, त्यांनी अर्धवट सुटलेले शिक्षण पूर्ण करण्याचा निश्चय केला. त्यासाठी यंदा दहावीचा १७ नंबरचा अर्ज भरला. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या राज्य शिक्षण मंडळाच्या सूत्रानुसार निकाल लावण्यात येणार असल्याने हशिम अडचणीत सापडले. दहावीच्या निकालासाठी त्यांना केंद्रात सहावीची मूळ गुणपत्रिका जमा करायची आहे. मात्र, त्यांच्याकडे ती नाही. ती शाळाही काही वर्षांपूर्वी बंद झाली आहे. त्यामुळे दहावी पास हाेऊ शकणार नाहीत, अशी भीती त्यांना आहे. अशा अडचणी येणारे हशिम कुरेशी एकटे नाहीत.

आर्थिक, सामाजिक परिस्थितीमुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेले अनेक विद्यार्थी १७ नंबरचा अर्ज भरून दहावी-बारावीच्या परीक्षा देऊन शिक्षण पूर्ण करत असतात. यंदाच्या अंतर्गत मूल्यमापन प्रक्रियेमुळे त्यांच्या निकालावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यातील अनेक विद्यार्थ्यांच्या मूळ शाळा आता बंद पडल्याने गुणपत्रिका आणण्यात त्यांना अडचणी येत आहेत. मूळ गुणपत्रिका उपलब्ध न झाल्यास नाईलाजास्तव त्यांचे मूल्यांकन होऊन निकाल तयार केले जाणार नाहीत आणि हे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून पुन्हा दूर जातील.

बाहेरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र असलेल्या शाळांकडेच या विद्यार्थ्यांच्या निकालाची जबाबदारी आहे. त्यामुळे शाळेतील नियमित विद्यार्थ्यांबरोबरच शाळांना अशा विद्यार्थ्यांचा शोध घ्यावा लागत आहे. त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप केले असले तरी तेथेही विद्यार्थी प्रतिसाद देतातच असे नाही. त्यांचा निकाल हा स्वाध्याय पुस्तिकांवर अवलंबून आहे. मात्र, विद्यार्थी शोधून स्वाध्याय पुस्तिका घेण्यात अडचणी येत आहेत, असे मुख्याध्यापकांनी सांगितले

दरम्यान, सतरा नंबरचा अर्ज भरून परीक्षा देणाऱ्या या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन हे त्यांच्या वर्षानुवर्षे जुन्या गुणपत्रिकांवरून करणे अयोग्य आहे. यामुळे शिक्षणाविषयीची ओढ असणाऱ्या आणि आपले शैक्षणिक भविष्य पुन्हा घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांनी व्यक्त केले.

* ...तर निकाल तयार हाेणार नाहीत

सतरा नंबरचा अर्ज भरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या मागील इयत्तेचे गुण लक्षात घेऊन अंतर्गत मूल्यमापन होणार आहे, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या मूळ गुणपत्रिका नसतील किंवा आवश्यक अभिलेख उपलब्ध नसतील त्यांचे निकाल केंद्रांकडून तयार होणार नाहीत. यामधील अनेक विद्यार्थी हे बोगसही असू शकतात.

- दिनकर पाटील,

अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक राज्य शिक्षण मंडळ

---------------------------