पावसामुळे वाहतुकीवर परिणाम
By Admin | Published: June 22, 2016 02:24 AM2016-06-22T02:24:16+5:302016-06-22T02:24:16+5:30
उन्हाच्या काहिलीने संतप्त झालेले मुंबईकर मंगळवारी पावसाच्या दमदार आगमनाने सुखावले खरे; मात्र पहिल्याच पावसात वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने आश्वासनांची खैरात केलेल्या
मुंबई : उन्हाच्या काहिलीने संतप्त झालेले मुंबईकर मंगळवारी पावसाच्या दमदार आगमनाने सुखावले खरे; मात्र पहिल्याच पावसात वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने आश्वासनांची खैरात केलेल्या प्रशासनाचा दावा फोल ठरला. सायंकाळी सातनंतर पावसाने ढगांच्या गडगडाटासह हजेरी लावली. कार्यालयांतून घरी जाण्याच्या घाईत असलेल्यांना पावसामुळे काहीसा विलंब झाला. मंगळवारी सायंकाळी आठ वाजेपर्यंतच्या कुलाबा येथे १०.८ तर सातांक्रूझ येथे अवघ्या १.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
पाऊस सुरू झाल्यानंतर काही वेळातच मेट्रोची वाहतूक मंदावली. मुंबई मेट्रो २५ मिनिटे उशिराने धावत होती. मेट्रोच्या डी. एन. नगर स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेमार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहे. लोकलच्या खोळंब्यामुळे प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, शहर-उपनगरांत पावसाच्या सरींसह आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता विभागाने वर्तविली आहे. (प्रतिनिधी)