निकाल वाचनास सुरुवात, हिट अॅण्ड रन केस
By admin | Published: December 8, 2015 01:18 AM2015-12-08T01:18:14+5:302015-12-08T01:18:14+5:30
हिट अॅण्ड रन केसप्रकरणी दोषी असलेला बॉलीवूड अभिनेता सलमान खानने केलेल्या अपिलावर उच्च न्यायालयाने सोमवारपासून निकाल वाचनास सुरुवात केली
मुंबई: हिट अॅण्ड रन केसप्रकरणी दोषी असलेला बॉलीवूड अभिनेता सलमान खानने केलेल्या अपिलावर उच्च न्यायालयाने सोमवारपासून निकाल वाचनास सुरुवात केली. सलमानचा पोलीस बॉडीगार्ड रवींद्र पाटील याची साक्ष दाखल करून घेणे योग्य आहे का? आणि त्याच्यावर ठेवण्यात आलेला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा योग्य आहे की नाही? यावर निर्णय घेणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
या प्रकरणी सत्र न्यायालयाने
६ मे रोजी सलमानला दोषी ठरवत पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. या शिक्षेविरुद्ध सलमानने उच्च न्यायालयात अपील केला. या अपिलावरील सुनावणी न्या. ए.आर. जोशी यांच्यापुढे होती.
कायद्यानुसार रवींद्र पाटील यांची नोंदवलेली साक्ष दाखल करून घेणे योग्य आहे की नाही, यावर निर्णय घेण्यात येईल, असे न्या. जोशी यांनी म्हटले. सरकारी वकिलांनी पाटील यांची साक्ष नोंदवल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. बचावपक्षाच्या वकिलांना त्याची उलटतपासणी घेण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याची साक्ष ग्राह्य धरता येणार नाही, असे सलमानच्या वकिलांचे म्हणणे आहे. सदोष मनुष्यवधाचा आरोप सलमानवर ठेवता येणार नाही, असेही सलमानच्या वकिलांचे म्हणणे आहे. त्यावर न्या. जोशी यांनी निकालात याही मुद्द्याचा विचार करण्यात येईल, असे म्हटले. (प्रतिनिधी)