निकाल जाहीर, पण संकेतस्थळावर दिसेना! , विद्यार्थी संभ्रमावस्थेत, गोंधळ सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 05:45 AM2017-08-29T05:45:42+5:302017-08-29T05:45:53+5:30
मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या कामाने आता वेग घेतला आहे. विद्यार्थ्यांचा आणि अन्य यंत्रणांचा वाढता रोष लक्षात घेऊन, निकालाची घाई विद्यापीठात सुरू झाली आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या कामाने आता वेग घेतला आहे. विद्यार्थ्यांचा आणि अन्य यंत्रणांचा वाढता रोष लक्षात घेऊन, निकालाची घाई विद्यापीठात सुरू झाली आहे. त्यामुळे रविवारी रात्री उशिरा घाईगडबडीत विद्यापीठाने टीवाय बीकॉमचे निकाल जाहीर केले, पण तांत्रिक अडचणींमुळे संकेतस्थळावर निकालच दिसत नसल्याने, सोमवारी विद्यार्थी चिंतेत होते. निकाल लागला, तरीही विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपत नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.
टीवाय बीकॉमच्या ५ व्या आणि ६ व्या सत्राचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले. मोठ्या निकालांपैकी एक निकाल असल्यामुळे विद्यापीठाने रविवारी रात्री सुटकेचा निश्वास सोडला होता, पण संकेतस्थळावर निकाल दिसत नसल्यामुळे, अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठात धाव घेतली. त्यामुळे आता विद्यापीठ पुन्हा चिंतेत पडले आहेत. अन्य निकाल जाहीर केले आणि विद्यार्थ्यांना कळलेच नाही, तर उपयोग काय? हा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहेत. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपतच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई विद्यापीठाने मार्च-एप्रिल दरम्यान, पदवी अभ्यासक्रमाच्या घेतलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने सुरू आहे. आॅगस्ट महिना उजाडूनही ४० हून अधिक निकाल जाहीर झाले नाहीत.
१० दिवसांत निकाल जाहीर
मुंबई विद्यापीठातील काही निकाल तांत्रिक अडचणींमुळे राखीव ठेवले आहेत. पण, लवकरात लवकर म्हणजे १० दिवसांत विद्यार्थ्यांना निकाल देण्यात येतील, असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तांत्रिक अडचणी दूर झाल्यावर विद्यार्थ्यांना निकाल दिसतील असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
परीक्षेला उपस्थित असल्याचे दाखले द्या
मुंबई विद्यापीठ एकामागोमाग एक निकाल जाहीर करत आहे, पण हे निकाल सदोष असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचा त्रास अजूनच वाढला आहे. एलएलबी अभ्यासक्रमाचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले, पण त्यामध्ये काही विद्यार्थी परीक्षेला उपस्थित असून, त्यांना गैरहजर दाखविण्यात आले आहे.
त्यामुळे या विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांना ज्या महाविद्यालयातून परीक्षा दिली आहे, त्या महाविद्यालयातून पत्र आणण्यास सांगितले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांची धावपळ होत आहे. मुंबई विद्यापीठ घोळ करून विद्यार्थ्यांना अडचणीत आणत आहे, पण या घोळातून बाहेर पडण्यासाठी नक्की काय प्रक्रिया आहे, याची माहिती आॅनलाइन द्यावी, अशी मागणी स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी केली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदी विष्णू मगरे
मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर होत नसल्याने सर्व बाजूने टीका सुरू आहे. त्यातच महत्त्वाच्या पदांवर प्रभारी व्यक्तींना रुजू केले जात आहे. कुलसचिव डॉ. एम.ए. खान यांची हज कमिटीवर नियुक्ती झाली आहे. त्यामुळे आता कुलसचिव पदाचा प्रभारी भार कीर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य विष्णू मगरे यांना दिला आहे. सोमवार, २८ आॅगस्टपासून मगरे यांनी हा नवीन पदभार स्वीकारला आहे.
विद्यापीठ प्रतिकूल परिस्थिीतीत असताना ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्याचे भान ठेवत विद्यापीठाला पूर्वलौकिक प्राप्त करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहीन. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अन्य संघटना यांच्यात समन्वय ठेवून विद्यापीठातील प्रलंबित विषय मार्गी लावण्यावर भर राहील.
- प्रा. विष्णू मगरे