निकालाच्या संकेतस्थळाचाच निक्काल लागला... !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:06 AM2021-07-17T04:06:22+5:302021-07-17T04:06:22+5:30
राज्य शिक्षण मंडळाचे संकेतस्थळ झाले क्रॅश, शिक्षणमंत्र्यांचे चौकशीचे आदेश लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई - माध्यमिक शालांत परीक्षेच्या संकेतस्थळावर अचानक ...
राज्य शिक्षण मंडळाचे संकेतस्थळ झाले क्रॅश, शिक्षणमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - माध्यमिक शालांत परीक्षेच्या संकेतस्थळावर अचानक भेट देणाऱ्यांची, निकाल पाहणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे हे संकेतस्थळ काही काळासाठी क्रॅश झाल्याने विद्यार्थांना आपला निकाल पाहता आला नाही. विद्यार्थी पालक, शिक्षकांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागला. रात्री उशिरापर्यंत निकालाचे संकेतस्थळ सुरूच झाले नव्हते. या सगळ्या पार्श्वभूमीवर या सर्व तांत्रिक बिघाडाच्या चौकशीचे आदेश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.
दरम्यान, निकालाची उत्सुकता असताना, निकाल तयार असूनही तो पाहता न आल्याने शिक्षक संघटना, विद्यार्थी, पालक वर्गाकडून राज्य शिक्षण मंडळाच्या या गैरसोयीबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्याचे घोषित केले होते. परंतु, दुपारचे दोन वाजले तरी अनेक विद्यार्थ्यांना निकालच पाहता आला नाही. एकाचवेळी अनेक विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळाला भेट दिली. परिणामी साईट क्रॅश झाली, असे राज्य शिक्षण मंडळाकडून सांगितले जात असून दहावीच्या निकालाचे संकेतस्थळ लवकरच पूर्ववत सुरू करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले.
दरवर्षी निकाल पाहण्यासाठी एमकेसीएलसह इतर संकेतस्थळे उपलब्ध करून दिली जातात. त्याचप्रमाणे मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून निकाल पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाते. परंतु यंदा केवळ एकच संकेतस्थळ निकाल पाहण्यासाठी दिले होते. राज्यतील १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळाला भेट दिल्याने त्यावर ताण आला, असे सांगितले जात आहे.
शिक्षणमंत्र्यांची अतिघाई विद्यार्थी, पालकांना मनस्ताप देई
शिक्षणमंत्री आणि अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने तसेच निकाल लावण्याची अतिघाई केल्यामुळेच साईट क्रॅश होण्याचा प्रकार घडून आला. त्यामुळे अनेक पालक, विद्यार्थी व शिक्षक मोबाईल व कॉम्प्युटरसमोर ताटकळत बसल्याने त्यांना प्रचंड मनस्ताप झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अनुदानित व विनाअनुदानित शाळा कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष संजय डावरे यांनी दिली. यासोबत एकूण मूल्यमापन केलेल्या १५,७५,७५२ विद्यार्थ्यांपैकी १५,७४,९९४ विद्यार्थी उत्तीर्ण आहेत, तर उर्वरित ७५८ विद्यार्थी अनुत्तीर्ण कसे, यामागील कारणेही मंडळाने स्पष्ट करावीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मंडळाकडे अध्यक्ष आणि अधिकारी संकेतस्थळ क्रॅश होण्याची तांत्रिक कारणे देत असले तरी, मंडळाची निकाल लावण्यासाठीची पूर्ण तयारी झाली नव्हती, हेच यातून समोर आले आहे. २ तासात सुरू होईल असे सांगूनही संकेतस्थळ सुरू झालेच नाही. यामुळे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांना जो मनस्ताप सहन करायला लागला, त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित करीत भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी मंडळाच्या दहावीच्या नियोजनावर टीका केली.