Join us

म्हाडा परीक्षेचा निकाल आठवडाभरात

By admin | Published: November 02, 2015 2:33 AM

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील (म्हाडा) विविध पदांसाठी तीन टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात आली. रविवारी अखेरच्या टप्प्यातही उमेदवारांकडून परीक्षेला चांगला प्रतिसाद लाभला

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील (म्हाडा) विविध पदांसाठी तीन टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात आली. रविवारी अखेरच्या टप्प्यातही उमेदवारांकडून परीक्षेला चांगला प्रतिसाद लाभला. तीन टप्प्यांमध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे.म्हाडातील कार्यकारी अभियंता, उप अभियंता, मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी, लेखाधिकारी, मिळकत व्यवस्थापक अशा सुमारे १७ पदांसाठी ५ ते २७ आॅगस्टपर्यंत आॅनलाइन अर्ज मागविले होते. २४४ जागांसाठी म्हाडाकडे तब्बल ४६ हजार अर्ज आले होते. कार्यकारी अभियंता (स्थापत्य), मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी, उपअभियंता (स्थापत्य व विद्युत), सहायक विधी सल्लागार, विधी सहायक, लेखाधिकारी, सहायक लेखाधिकारी, मिळकत व्यवस्थापक/ प्रशासकीय अधिकारी, सहायक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य व विद्युत) या पदांची परीक्षा २0 आॅक्टोबर रोजी घेण्यात आली. तसेच लघुटंकलेखक आणि कनिष्ठ लिपिक टंकलेखक या पदांसाठी २५ आॅक्टोबर आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, भूमापक, वायरमन या पदांसाठी १ नोव्हेंबर रोजी परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी सुमारे ५ हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी सुमारे ४ हजार उमेदवारांनी रविवारी परीक्षा दिल्याचे, म्हाडाचे सचिव डॉ. बी.एन. बास्टेवाड यांनी सांगितले. तीन टप्प्यांमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेला सुमारे ७२ टक्के उमेदवार बसले होते. या परीक्षेचा निकाल आठवडाभरात जाहीर करण्यात येईल; तसेच मेरिटनुसार उमेदवारांची यादीही म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याचे बास्टेवाड म्हणाले. (प्रतिनिधी)