मुंबई : मुंबई विभागाचा बारावीचा निकाल ८९.३५ टक्के लागला असून मागील वर्षापेक्षा निकालात ५.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निकालाला लेटमार्क लागला असला तरी मुंबईसारख्या रेड झोन विभागातील उत्तरपत्रिकांचे संकलन आणि निकालांच्या कामाला वेग देणे हे आव्हान होते. या आव्हानांचा सामना करत मुंबई विभागीय मंडळाने बारावीच्या उत्तरपत्रिका संकलनाचे आणि निकालाचे काम कसे पूर्ण केले याविषयी मुंबई विभागाचे सचिव संदीप संगवे यांनी माहिती दिली.राज्य मंडळाच्या एकूण नऊ विभागीय मंडळांपैकी मुंबई विभागीय मंडळात सर्वाधिक विद्यार्थीसंख्या असलेल्या या विभागातील उत्तरपत्रिका लॉकडाऊनमुळे जैसे थे अडकून पडल्या. त्या मॉडरेटर्सपर्यंत पोहोचवणे आणि संकलन करणे हेच मंडळापुढे आव्हान होते. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात काहीच काम होऊ न शकल्याने १९ मेपासून फक्त १५ टक्के कर्मचारी उपस्थितीतही मंडळाचे काम सुरू केल्याची माहिती संगवे यांनी दिली. विद्यार्थीहित लक्षात घेता कोरोनाबाधित होऊनही काम थांबविण्यात आले नाही. उलट कर्मचाऱ्यांनी अधिक संघभावनेने काम केल्याची माहिती त्यांनी दिली.पुनर्मूल्यांकन प्रक्रियाही आॅनलाइनजुलै, आॅगस्टमध्ये होणाºया फेरपरीक्षेबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे संगवे यांनी सांगितले. हा निर्णय राज्य मंडळाकडून घेतला जाईल आणि तो सर्व विभागीय मंडळांना कळविला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका पडताळणी, पुनर्मूल्यांकन प्रक्रियाही आॅनलाइन उपलब्ध असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.गुणपत्रिका कधी मिळणार?आॅनलाइन निकाल जाहीर झाला असला तरी दरवर्षीप्रमाणे यंदा साधारणपणे आठवडाभरात गुणपत्रिका मिळणे अवघड आहे. राज्य मंडळाकडून लवकरच याबाबत निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी माहिती संगवे यांनी दिली.
रेड झोनमधील आव्हानांना तोंड देत मुंबई विभागाचा निकाल जाहीर; फेरपरीक्षा, गुणपत्रिकेबाबत लवकरच निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 3:12 AM