मुंबई : ‘मुंबई विद्यापीठाचे काम, महिनोन्महिने थांब’ असा सर्वसामान्य विद्यार्थी आणि पालकांचा समज. नेहमीच विलंबाने लागणारे विद्यापीठाचे निकाल याची प्रचिती कायम देत असतात. मात्र, एका विद्यार्थ्याचा पुनर्मूल्यांकनाचा निकाल विद्यापीठाने अवघ्या चार दिवसांत जाहीर केल्याने कॅम्पस आणि कॅम्पसबाहेर याचीच चर्चा सुरू आहे. निकाल जाहीर केलेला विद्यार्थी एका राजकीय नेत्याचा खाजगी सचिव असल्याने विद्यापीठाने ही कार्यतत्परता दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली.एलएलएम शिकत असलेल्या या विद्यार्थ्याचा पहिल्या सत्राचा निकाल २६ मार्च रोजी जाहीर झाला. दोन विषयांत नापास झाल्याने त्याने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला. एरव्ही पुढची परीक्षा उलटली तरी पुनर्मूल्यांकनाचा निकाल न लावणाऱ्या विद्यापीठाने या विद्यार्थ्याचा निकाल मात्र ४ दिवसांत त्याच्या हाती सोपविला. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या पुनर्मूल्यांकनाच्या निकालासाठी लढणाºया संघटना आणि विद्यार्थ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजकारणी व्यक्तींचा वरदहस्त लाभल्यामुळे या विद्यार्थ्याच्या निकालावर विद्यापीठाची कृपा झाली असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.‘पुनर्मूल्यांकन नियमानुसार’यासंदर्भात उपकुलसचिव आणि परीक्षा विभागाचे जनसंपर्क अधिकारी विनोद मळाळे यांच्याशी संपर्क साधला असता, पुनर्मूल्यांकन नियमाप्रमाणे झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विद्यार्थ्याचा आॅनलाइन अर्ज आल्यावर त्याच्यावर पुढील प्रक्रिया होऊन निकाल लावण्यात आला आहे. हा विद्यार्थी दोन विषयांत नापास होता. मात्र पुनर्मूल्यांकनात तो एकाच विषयात पास झाला आहे. त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारची विशेष बाब म्हणून प्राधान्य देण्यात आले नसल्याचे त्यांनी म्हटले.‘इतरांसाठी कार्यतत्परता दाखवा’हा निकाल जर नियमानुसार लागला असेल, तर विद्यापीठ कौतुकास पात्र आहे. मात्र, इतर विद्यार्थ्यांचे निकालही त्यांनी असेच वेळेत आणि तत्परतेने का लावले नाहीत, असा सवाल युवासेना सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी केला आहे.>विद्यापीठाने केलेला हा प्रकार म्हणजे म्हणजे निव्वळ पक्षपातीपणा असून खाजगीकरणाकडे नेण्याचा डाव आहे. कुलगुरू सुहास पेडणेकर आणि विद्यापीठ प्रशासनाकडून राजकीय नेत्यांचा वरदहस्त असलेल्यांना निकाल लवकर दिला जातो. - सचिन पवार, स्टुडण्ट लॉ कौन्सिल
‘त्या’ विद्यार्थ्याचा निकाल अवघ्या चार दिवसांत झाला जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 6:14 AM