मुंबई : मुंबई विद्यापीठात घेण्यात आलेल्या सिनेटच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर ३ विद्यापीठ अध्यापक, १० प्राचार्य आणि ६ व्यवस्थापनाचे प्रतिनिधी या जागांचे निकाल जाहीर करण्यात आले. विद्यापीठ अध्यापक या गटातील ३ जागांसाठी ७ फेब्रुवारीला मतदान घेण्यात आले होते. या तीन जागांच्या निकालासाठी शुक्रवारी मतमोजणी करण्यात आली असून, यामध्ये खुल्या प्रवगार्तून डॉ. सुरेश मैंद, महिला प्रवर्गातून डॉ. संगीता पवार आणि अनुसूचित जाती प्रवर्गातून डॉ. मृदुल निळे हे उमेदवार विजयी झाले.अधिसभेवर विद्यापीठ अध्यापक गटातून ३ जागांसाठी एकूण १३ उमेदवार (खुला प्रवर्ग- ६, महिला-४ आणि अनुसूचित जाती या राखीव प्रवगार्तून ३) निवडणुकीसाठी उभे होते. एकूण १७४ मतदारांपैकी १६५ मतदारांनी या निवडणुकीत भाग घेऊन त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. या गटासाठी एकूण ९५ टक्के मतदान झाले होते. यामध्ये १५६ मते वैध ठरले, तर ९ मते अवैध ठरली.अधिसभेवर प्राचार्य गटातून १० जागांसाठीची निवडणूक ही बिनविरोध झाली. यासाठी खुल्या प्रवर्गातून (५ जागा) विठ्ठल शिवणकर, अजय भामरे, श्याम जोशी, तुषार देसाई आणि नागेंद्रनाथ पांडे हे खुल्या प्रवगार्तून बिनविरोध निवडून आले. महिला प्रवगार्तून अनुजा पळसुले देसाई, अनुसूचित जाती प्रवगार्तून विठ्ठल रोकडे, विज-भज, महादाप्पा गोंडा आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातून धनाजी गुरव हे उमेदवार निवडून आले, तर अनुसूचित जमाती या प्रवर्गातून एकही नामांकन न आल्यामुळे ही जागा रिक्त राहिली आहे. व्यवस्थापन प्रतिनिधीत गटाच्या खुल्या प्रवर्गातून (४ जागा) हृषिकेश पोळ, संजय शेटे, नील हेळेकर आणि हसमुख रांभिया हे बिनविरोध निवडून आले. महिला प्रवर्गातून शिल्पा पटवर्धन आणि अनुसूचित जाती प्रवर्गातून सुभाष वाघमारे हे बिनविरोध निवडून आले.
अधिसभेच्या तीन मतदारसंघांचे निकाल जाहीर, मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 1:08 AM