Join us

मुंबई विद्यापीठाचे निकाल रखडलेले

By admin | Published: February 08, 2017 4:36 AM

मुंबई विद्यापीठाचा कारभार डिजिटल होत असताना दुसरीकडे मात्र, परीक्षा होऊन तीन महिने उलटल्यानंतरही निकाल लागलेला नाही

मुंबई: मुंबई विद्यापीठाचा कारभार डिजिटल होत असताना दुसरीकडे मात्र, परीक्षा होऊन तीन महिने उलटल्यानंतरही निकाल लागलेला नाही. निकालाच्या प्रतीक्षेत असणारे विद्यार्थी त्रस्त झाले असून, विद्यापीठात खेपा मारत आहेत. या वेळी तपासणी केंद्राची संख्या ३० ने वाढवूनही विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपलेली नाही. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे विद्यार्थ्यांच्या पाचव्या सत्राचे निकाल अजूनही लागलेले नाहीत. निकाल वेळेत लागावेत, यासाठी तपासणी संख्या ६० वरुन ९० करण्यात आली होती, पण यामुळेच पेपर एकत्र करण्यास उशीर झाल्याचे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबई विद्यापीठातील तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्राच्या परीक्षा होऊन तीन महिने उलटले आहेत. या परीक्षांमधील काही निकाल जाहीर झाले आहेत, पण महत्त्वाचे निकाल अजूनही लागलेले नाहीत. शेवटच्या वर्षात पाचव्या आणि सहाव्या दोन्ही परीक्षांचे गुण ग्राह्य धरले जातात. आता विद्यार्थ्यांना केटी लागली, तर पुन्हा पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कधी भरणार? आणि त्याचा निकाल कधी लागणार? हे प्रश्न विद्यार्थ्यांना पडले आहेत. विद्यापीठ कायदा १९९४ नुसार कोणतीही परीक्षा झाल्यानंतर कमीत कमी ३५ तर जास्तीत जास्त ४५ दिवसांत निकाल जाहीर होणे बंधनकारक आहे. यंदा टीवायबीएची परीक्षा ३ आॅक्टोबरला सुरू होऊन १० नोव्हेंबरला संपली. टीवायबीकॉमची परीक्षा २७ आॅक्टोबरला सुरू होऊन २२ नोव्हेंबरला संपली, तर टीवायबीएसस्सीची परीक्षा १८ आॅक्टोबरला २७ आॅक्टोबरला संपली. अद्याप या परीक्षांचे निकाल लागलेले नाहीत. दरम्यान, पुढच्या आठवड्यात निकाल जाहीर होतील, असे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)