विद्यापीठाचे निकाल आस्ते कदम
By admin | Published: June 12, 2017 12:37 AM2017-06-12T00:37:41+5:302017-06-12T00:37:41+5:30
मुंबई विद्यापीठात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचा निकाल हा ४५ दिवसांच्या आत लावावा, असा नियम आहे.; पण मुंबई विद्यापीठातर्फे २०१६ मध्ये घेतलेल्या द्वितीय सत्राच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचा निकाल हा ४५ दिवसांच्या आत लावावा, असा नियम आहे.; पण मुंबई विद्यापीठातर्फे २०१६ मध्ये घेतलेल्या द्वितीय सत्राच्या २१० परीक्षांचे निकाल हे ४५ दिवसानंतर लागल्याचे माहितीच्या अधिकारात स्पष्ट झाले आहे.
वर्ष २०१६च्या प्रथम सत्रातील एकूण परीक्षेच्या ३० टक्के परीक्षांचा निकाल ४५ दिवसांंनंतर घोषित करण्यात आला, तर द्वितीय सत्रातील परीक्षांचे ५४ टक्के निकाल हे ४५ दिवसांनी जाहीर झाले. वर्ष २०१६ च्या द्वितीय सत्रात एकूण ३८८ परीक्षा झाल्यात त्यापैकी ३० दिवसांत ८७ निकाल म्हणजे २४.२२ टक्के निकाल जाहीर केले. यात ३२ हे कला, विज्ञानाचे १४, अभियांत्रिकी ३८ आणि विधिचे ३ निकाल होते. वाणिज्य परीक्षेचे निकाल एकही नव्हता. ४५ दिवसांत ९१ म्हणजे २३.४५ टक्के निकाल जाहीर केले त्यात २० कला, एक वाणिज्य, १५ विज्ञान, ५४ अभियांत्रिकी आणि १ विधि परीक्षेचे निकाल होते. ४५ दिवसानंतर २१० म्हणजे ५४.१२ टक्के निकाल जाहीर झाले त्यात ५४ कला, ६० वाणिज्य, १६ विज्ञान, ६८ अभियांत्रिकी आणि १२ विधि परीक्षेचे निकाल होते, अशी माहितीच्या अधिकाराचे कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती दिली.
तसेच विद्यापीठात प्रोफेशनल कोर्सेच्या (बॅफ, बीएमएम इत्यादी) विद्यार्थ्यांची संख्या अडीच लाखांच्या आसपास आहे. बीकॉमचे प्राध्यापकच या कोर्सेसचे पेपर तपासतात. बीकॉमला प्राधान्य दिल्यास अन्य कोर्सेसचे निकाल लागण्यास उशीर होतो. विद्यापीठातंर्गत ७५० महाविद्यालये आहेत. त्यापैकी २०० महाविद्यालये अनुदानित आहेत, तर १०० अल्पसंख्याक महाविद्यालये आहेत. विनाअनुदानित महाविद्यालयांतील काही प्राध्यापकांना परीक्षेनंतर बे्रक दिला जातो आणि परीक्षांचे पेपर हे अनुभवी प्राध्यापकांकडून तपासले जातात. त्यामुळे काही परीक्षांच्या निकालांना उशीर होतो, असे मुंबई विद्यापीठाचे परीक्षा आणि मूल्यमापन नियंत्रक विभागाचे संचालक दीपक वेसावे यांनी सांगितले.
दोन परीक्षा एकत्रित आल्याने निकाल उशिरा
विद्यापीठातर्फे २०१६ या काळात पाचव्या आणि सहाव्या सत्राच्या परीक्षा झाल्या होत्या. या दोन्ही परीक्षा एकत्रित झाल्याने प्राध्यापकांनी पाचव्या आणि सहाव्या सत्राच्या परीक्षांच्या पेपर तपासण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या सत्राच्या परीक्षांचे निकाल उशिरा लागले, अशी माहिती दीपक वेसावे यांनी दिली.