मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांना लेटमार्क लागला होता. त्यानंतरही आॅनलाइन पद्धतीने उत्तरपत्रिका तपासणी करायचा निर्णय विद्यापीठाने घेतल्याने विद्यार्थी तणावात होते, पण सध्या आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरळीत सुरू आहे. ४०२ पैकी १२९ निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत, तसेच १० लाख ४९ हजार ३०३ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन झाले आहे, तर उर्वरित ३ लाख ५७ हजार ५३२ उत्तरपत्रिकांच्या तपासणीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. सर्व निकाल वेळेवर जाहीर होणार, असे आश्वासन प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी दिले.उन्हाळी सत्राच्या निकालांमुळे विद्यापीठावर टीकेची झोड उठली होती, पण सध्या हिवाळी परीक्षांच्या निकालाचे काम सुरळीत आणि वेगात सुरू आहे. याविषयी माहिती देण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी प्रभारी कुलगुरूंसह परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अर्जुन घाटुळेदेखील उपस्थित होते.डॉ. घाटुळे यांनी उत्तरपत्रिका मूल्यांकनाविषयी माहिती देताना सांगितले, हिवाळी परीक्षेनंतर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे १४ लाख ७ हजार ३५ उत्तरपत्रिका तपासणीसाठी आल्या आहेत. त्यापैकी आता फक्त ३ लाख ५७ हजार ५३२ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन शिल्लक आहे. १० लाखांहून अधिक उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे. हे मूल्यांकन योग्य आणि सदोष पद्धतीने करण्यात आले आहे.वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यासाठी सर्वाधिक म्हणजे ३ हजार २५३ प्राध्यापक काम केले आहे, असेही डॉ. घाटुळे यांनी सांगितले.वाणिज्यचा निकालही वेळेवर लावणारउन्हाळी परीक्षांच्या निकालांमध्ये सर्वाधिक गोंधळ हा वाणिज्य शाखेच्या निकालांचा झाला होता. उत्तरपत्रिका तपासणीला उशीर झाला होता, पण या वेळच्या परीक्षेसाठी विद्यापीठाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. वाणिज्य शाखेच्या निकालासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत, तसेच अधिक प्राध्यापकांची मदत घेतली जात असल्याची माहिती विद्यापीठाने दिली.
निकाल वेळेवर जाहीर करणार, प्रभारी कुलगुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 5:12 AM