मुंबई : म्हाडामार्फत मे महिन्यात काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये यशस्वी झालेल्या विजेत्यांना लॉटरीसंबंधित कागदपत्रे जमा करण्यास म्हाडाने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. लॉटरीतील सुमारे दीडशे विजेत्यांना आता ७ आॅक्टोबरपर्यंत कागदपत्रे जमा करायची आहेत.म्हाडाने ३१ मे रोजी १ हजार ६३ घरांची लॉटरी काढली. मुंबई मंडळाच्या लॉटरीमध्ये यशस्वी झालेल्या विजेत्यांना अॅक्सिस बँकेत कागदपत्रे जमा करण्यासाठी ७ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीनंतरही अनेक विजेत्यांनी अद्यापपर्यंत कागदपत्रे जमा केली नव्हती. त्यामुळे म्हाडाने विजेत्यांना २२ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती. या मुदतीनंतरही अनेकांनी कागदपत्रे जमा केलेली नाहीत. त्यामुळे पुन्हा म्हाडाने कागदपत्रे जमा करण्याची मुदत ७ आॅक्टोबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.अॅक्सिस बँकेने म्हाडाकडे ४२९ विजेत्यांची कागदपत्रे जमा केली आहेत. उर्वरित ४२५ विजेत्यांनी कागदपत्रे जमा केली असून, ती बँकेकडून लवकरच म्हाडाला मिळतील. तर अद्यापपर्यंत सुमारे दीडशे विजेत्यांनी कागदपत्रे जमा केलेली नाहीत. त्यांच्यासाठी ही मुदत वाढविण्यात आल्याचे, म्हाडाचे उपमुख्य अधिकारी (पणन) टी.डी. मठकर यांनी सांगितले.
कागदपत्र सादर करण्यास पुन्हा मुदतवाढ
By admin | Published: September 30, 2015 2:00 AM